Kajol And Farah Funny Video : मनोरंजन सृष्टीतले अनेक कलाकार आता यूट्यूबद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. यूट्यूबवर ही मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक व्लॉग व्हिडीओ शेअर करीत असतात. या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलीच प्रसिद्धी मिळताना दिसते. त्यातील एक कलाकार लोकप्रिय आहे; ती म्हणजे फराह खान. फराह खान आणि तिचा स्वयंपाकी दिलीप यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलवर अनेक कलाकारांना आमंत्रित करीत असते. या कलाकारांबरोबर ती इंडस्ट्री आणि त्यांच्या करिअरबद्दल गप्पा मारते, तर कधी कधी ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करतात. फराह शेअर करीत असलेल्या व्हिडीओमधील तिचा स्वयंपाकी दिलीप हा सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. नुकत्याच एका भागात फराहनं बॉलीवूड अभिनेत्री काजोलला बोलावलं होतं.
काजोल सध्या तिच्या माँ या नवीन चित्रपटाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्या निमित्तानं अभिनेत्री फराहच्या खानच्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी गेली होती. मात्र, त्यानंतर जे काही झालं, ते खूपच हास्यास्पद आहे. या व्हिडीओची एक झलक नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
फराह खान इन्स्टाग्राम व्हिडीओ
या व्हिडीओत काजोल भेटायला येणार म्हणून फराहचा स्वयंपाकी खूपच उत्सुक आहे आणि तिला भेटण्यासाठी त्यानं शाहरुखचा खास लूकही केला असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत फराह खान दिलीपला सांगते, “दिलीप तुला माहीत आहे का आज आपल्याकडे कोण येत आहे? आपल्याकडे आज काजोल येणार आहे.” त्यावर दिलीप म्हणतो, “मला माहीत आहे आणि म्हणूनच मी ‘दिलवाले’च्या लूकमध्ये त्यांची वाट पाहत आहे.”
पुढे व्हिडीओमध्ये दारावरची बेल वाजताच, फराह आणि दिलीप दाराकडे धावतात; पण तेव्हा दारावर काजोलचा पीआर आलेला असतो. मग तिचा अंगरक्षक येतो. त्यानंतर एकामागोमाग तिचा सोशल मीडिया मॅनेजर, मदतनीस, मेकअप आर्टिस्ट असे सगळे येतात. शेवटी एक माणूस येतो, जो “मी इथे असाच आलो आहे” असं म्हणतो. या व्हिडीओत सगळे येतात; पण काजोल मात्र येत नाही. त्यामुळे फराह आणि दिलीप नाराज होतात.
मग नाराज झालेली फराह या व्हिडीओत “काजोलनं आपल्याबरोबर मस्करी केली आहे. त्यामुळे आता दार बंद कर आणि चल,” असं म्हणते आणि दार लावून घेते. त्यानंतर मात्र येतो खरा ट्विस्ट आणि तो म्हणजे फराहनं दार बंद करताच अभिनेत्री काजोल तिथे येते. त्यानंतर ती सतत दारावरची बेल वाजवते; पण कोणीच दरवाजा उघडत नाही. त्यामुळे काजोल फराहच्या नावानं जोरात ओरडते.
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी या व्हिडीओवर हसण्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली फराह आणि तिचा स्वयंपाकी दिलीपचं कौतूक केलं आहे. तसेच फराह आणि तिचा स्वयंपाकी यांची ही रील आवडल्याचंही म्हटलं आहे.