Kajol Talks About Paparazzi : लोकप्रिय अभिनेत्री काजोलने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत ९०च्या काळात प्रेक्षकांच्या मनावर जणू राज्य केलं होतं. त्या काळातील ती प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तिची व अभिनेता शाहरुख खानची जोडी हिंदी चित्रपटांमधील सुपरहिट जोडी मानली जायची. अशातच सध्या अभिनेत्री चर्चेत आहे ते तिच्या ‘माँ’ या आगामी चित्रपटामुळे. त्यामध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
काजोलने तिच्या ‘माँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान काही मुलाखती दिल्या. त्यातील एका मुलाखतीमध्ये तिने पापाराझींबद्दल मत व्यक्त केलं आहे. काजोल नेहमीच ठामपणे तिची मतं मांडत असते. यामध्येसुद्धा तिने पापाराझींबद्दलचं तिचं मत स्पष्टपणे मांडलं आहे. ‘झूम’शी संवाद साधताना ती याबद्दल म्हणाली, “मी स्पष्ट बोलते म्हणून जर तुम्हाला माझी भीती वाटत असेल, तर माझी काहीच हरकत नाही. उलट तुम्ही तर माझा ‘माँ’ चित्रपट पाहिलाच पाहिजे. कारण- आताच्या घडीला व्हिडीओला फार महत्त्व आहे”.
काजोल पुढे म्हणाली, “पापाराझींबाबतही तसंच आहे. तुम्ही काहीतरी बोलावं यासाठी ते थांबलेले असतात. कधी कधी तर ते तुम्हाला बोलण्यास भाग पाडतात. तुम्ही चिडणार किंवा बोलणार हे त्यांना माहीत असतं म्हणून मुद्दाम आग्रह केला जातो. पापाराझी फक्त चांगले फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी थांबलेले नसतात, तर बऱ्याचदा त्यांना कलाकारांच्या प्रतिक्रिया हव्या असतात. जेणेकरून त्यांना त्या त्यांच्या सोईनुसार नकारात्मक पद्धतीनं वापरता येतील. कारण- कलाकरांच्या प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ते त्यांना हवं तसं शीर्षक देतात”.
काजोलने ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्येसुद्धा पापाराझींबद्दल वक्तव्य केलं होतं. ती म्हणाली, “मला असं वाटतं की, प्रत्येक ठिकाणी पापाराझींनी येण्याची गरज नसते. काही ठिकाणं अशी असतात, जिथे त्यांनी येऊ नये. मला आवडत नाही जेव्हा कलाकार कोणाच्या तरी अंत्यविधीसाठी गेलेले असतात तेव्हासुद्धा पापाराझी त्यांच्याकडे फोटो मागतात. हे खूप चुकीचं आहे, असं वाटतं. तुम्ही सामान्य माणसांप्रमाणे लंचला किंवा कुठे बाहेरही जाऊ शकत नाही त्यामुळे मला हे खूपच विचित्र वाटतं”.
दरम्यान, काजोल लवकरच विशाल फुरिया दिग्दर्शित आणि अजय देवगणची निर्मिती असलेल्या ‘माँ’ या चित्रपटातून झळकणार आहे. त्यामध्ये ती एका आईची भूमिका साकारणार आहे.हा चित्रपट येत्या शुक्रवारी (२७ जून) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.