२०२४ हे वर्ष हॉरर चित्रपटांच्या बाबतीत खूप खास होतं. अजय देवगण आणि आर माधवन यांचा ‘शैतान’ चित्रपट चांगलाच गाजला. त्यानंतर ‘मुंज्या’नेही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मग ‘स्त्री २’लादेखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर आता २०२५ हे वर्ष हॉरर चित्रपटांसाठी खास असणार असल्याचं चित्र दिसत आहे. या वर्षात अक्षय कुमार ते संजय दत्तसारखे कलाकार हॉरर चित्रपट घेऊन येणार आहेत.

या कलाकारांच्या यादीत आता एका अभिनेत्रीचं नाव सामील होणार आहे, ती म्हणजे काजोल. काजोलचा आगामी चित्रपट ‘माँ’ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. काजोलने सोशल मीडियावर रक्षक आणि भक्षक या थीमसह चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरची झलक शेअर केल्यापासून चाहत्यांमध्ये या अनोख्या हॉरर-थ्रिलर चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

काजोलचा ‘माँ’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे. उद्या २९ मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला येणार असून यानिमित्ताने काजोलने तिच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचं एक नवं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये काजोल अगदी लढाऊ वृत्तीने लढण्यासाठी खंबीर उभी आहे. तर तिच्यामागे काली ‘माँ’ देवी असल्याची पाहायला मिळत आहे.

‘माँ’ या चित्रपटापूर्वी काजोल अनेक महिलाप्रधान चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अशातच तिचा ‘माँ’ चित्रपटदेखील महिला प्रधान असून यातील तिची भूमिका लक्षवेधक असल्याचं दिसत आहे. याआधी काजोलने ‘दो पत्ती’ आणि ‘दुश्मन’ सारख्या महिलाप्रधान चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे आता काजोलच्या ‘माँ’ चित्रपटासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विशाल फुरिया दिग्दर्शित ‘माँ’ येत्या २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण आणि ज्योती देशपांडे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘माँ’ चित्रपटात काजोलसह रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता, जितिन गुलाटी, गोपाल सिंग, सूर्यशिखा दास, यानिया भारद्वाज, रूपकथा चक्रवर्ती आणि खेरिन शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.