Kajol reveals Advice of kids Yug and Nysa: ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून काजोलचा उल्लेख केला जातो. १९९२ साली ‘बेखुदी’ या चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
‘बेखुदी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. मात्र, त्यानंतर काजोलने ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे’, ‘गुप्त’, ‘इश्क’, ‘कुछ कुछ होता है’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. विशेष म्हणजे तिचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजले. आतापर्यंत अभिनेत्रीने ज्या चित्रपटांत काम केले, त्यामधील काही चित्रपट रोमँटिक होते, काही खळखळून हसवणारे तर काही रडवणारे होते. मात्र, काजोलने कोणत्याही भयपटात काम केले नाही.
काजोल काय म्हणाली?
काजोल लवकरच ‘माँ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा भयपट असून काजोल पहिल्यांदाच अशा चित्रपटात काम करत आहे. आता ‘हिंदूस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत काजोलने ‘माँ’ चित्रपटाबाबत वक्तव्य केले. काजोल म्हणाली, “माँ चित्रपटाची गोष्ट आवडली, कारण मला पौराणिक कथा आवडतात. त्यापैकी मला माँ काली व रक्तबीज यांची गोष्ट फार आवडते.”
‘माँ’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मुलांची प्रतिक्रिया काय होती? यावर काजोल म्हणाली, “युग व न्यासाने ट्रेलर पाहिला आहे. मी त्यांना चित्रपटदेखील पाहायला लावेन. कदाचित न्यासा पाहणार नाही, कारण तिला भयपट आवडत नाहीत.”
काजोल किंवा अजय देवगणच्या चित्रपटांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल मुलांची काही मतं असतात का? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “ते कायमच त्यांची मतं मांडत असतात. ते त्यांच्या मताबद्दल स्पष्ट आहेत आणि सतत त्यांचे विचार बदलत नाहीत. ते मला म्हणतात की, आम्ही तुला चित्रपटात रडताना पाहू शकत नाही. पप्पा जशा चित्रपटात काम करतात, तशाच चित्रपटांत तू देखील काम केले पाहिजेस. तू ‘गोलमाल’सारख्या चित्रपटात काम कर.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मुलांना असं वाटतं की मी अशा चित्रपटात काम केलं पाहिजे, जे खळखळून हसवतात. ज्यामध्ये कोणीही रडणार नाही, मला काही होणार नाही, अशा चित्रपटात काम केले पाहिजे. दुसरीकडे मला असे वाटत असते की ज्या चित्रपटात माझ्याबाबत काही दु:खद घडणार नाही, ज्यामध्ये मला काही करायचे नाही, अशा चित्रपटात मी का आहे, हा कसा चित्रपट आहे, असा मी विचार करत असते.”
दरम्यान, विशाल फुरिया दिग्दर्शित ‘माँ’ हा चित्रपट २७ जूनला प्रदर्शित होणार आहे.