विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटापासूनच विवेक अग्निहोत्री हे कायम चर्चेत आहेत. चित्रपटाबरोबरच ते बॉलिवूडबद्दल अन् स्टार सिस्टमबद्दल परखडपणे भाष्य करतात.

चित्रपटसृष्टीतील राजकारण, घराणेशाही याबद्दलही विवेक यांनी बऱ्याचदा भाष्य केलं आहे. याबरोबरच ते राजकीय भूमिका घ्यायलाही पुढे मागे बघत नाहीत. यामुळे बऱ्याचदा त्यांच्यावर टीकाही झालेली आहे. आता विवेक यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विवेक अग्निहोत्री चित्रपटसृष्टीतील तीन खान मंडळी यांच्याबद्दल भाष्य करत आहेत.

आणखी वाचा : “द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट चिंताजनक…” नसीरुद्दीन यांच्या वक्तव्यावर पल्लवी जोशीची प्रतिक्रिया; म्हणाली…

बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक केआरके म्हणजेच कमाल आर खान याने विवेक यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विवेक अग्निहोत्री एका मुलाखतीमध्ये बोलत आहेत. ते म्हणाले, “आपल्या चित्रपटसृष्टीतील तीन सर्वात लोकप्रिय सुपरस्टार्स हे मुस्लिम आहेत, त्यापैकी दोघे हे मुस्लिम रीती-रिवाजाचं काटेकोरपणे पालन करणारे आहेत, शाहरुख खान कधीही कोणालाही भेटल्यावर नमस्ते म्हणत नाही. तो फक्त त्याच्या रीतीनुसार सलाम करतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवेक अग्निहोत्री यांच्या या व्हिडीओनंतर लगेचच शाहरुख खानची एक क्लिप जोडण्यात आली आहे ज्यात तो एका मोठ्या मंचावर लोकांना नमस्ते म्हणत अभिवादन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना केआरके लिहितो की, “एखाद्याविषयी अपप्रचार करण्यासाठी विवेक अग्निहोत्री हे खोटं का बोलतात हे अद्याप मला समजलेलं नाही.” विवेक यांचा हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केआरकेने ट्वीट केलेल्या या व्हिडीओखाली बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया देत विवेक यांच्यावर टीकाही केली आहे.