बॉलीवूडची क्वीन कंगना रणौतने आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. ती हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. चित्रपट हिट होत नसल्याने तिने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर तिने काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.

बॉक्स ऑफिसवर सिनेमे फ्लॉप होत असल्याने राजकारण प्रवेश केलास का? असं कंगनाला ‘टाइम्स नाउ समिट’ मध्ये विचारण्यात आलं. त्यावर ते कारण नसल्याचं तिने सांगितलं. यावेळी तिने शाहरुख खानचं उदाहरण दिलं. “या जगात असा एकही अभिनेता नाही ज्याचे चित्रपट कधीच फ्लॉप झाले नसतील. शाहरुखने १० वर्षात एकही हिट दिला नव्हता, मग त्याचा ‘पठाण’ सिनेमा आला. माझे सिनेमे ७-८ वर्षे चालले नाही, नंतर ‘क्वीन’ हिट झाला. मग पुन्हा ३-४ वर्षे सिनेमे हिट झाले नाहीत आणि ‘मणिकर्णिका’ हिट झाला. आता ‘इमर्जेन्सी’ चित्रपट येत आहे, मला आशा आहे की तो चालेल,” असं कंगना म्हणाली.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने सहाव्या दिवशी कमावले ८६ लाख रुपये, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या

ओटीटीमुळे कलाकारांना आपलं कौशल्य दाखवायची संधी मिळत आहे, असं विधान कंगनाने केलं. “आजकाल ओटीटीमुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याच्या अधिक संधी आहेत. स्टार्सची आमची शेवटची पिढी आहे. ओटीटीमध्ये कोणतेही स्टार्स नाही. आम्ही लोकांच्या ओळखीचे चेहरे आहोत आणि आम्हाला खूप मागणी आहे, पण ओटीटीचं असं नाही,” असं कंगना म्हणाली.

कंगना रणौतचा ‘इमर्जेन्सी’ चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि मिलिंद सोमण यांच्याही भूमिका आहेत.