Karan Johar Post After SRK Wins First National Award : शाहरुख खानला ३३ वर्षांच्या कारकिर्दीत अखेर पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मनोरंजनसृष्टीत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा १ ऑगस्टला करण्यात आली. यंदा किंग खानला ‘जवान’ सिनेमासाठी सर्त्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. तर, राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शाहरुख आणि राणी या दोघांनी पुरस्कार जाहीर होताच प्रतिक्रिया देत त्यांचे चाहते, जुरी मेंबर्स आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. संपूर्ण मनोरंजन विश्वातून या दोघांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. राणी आणि शाहरुखचा जवळचा मित्र तसेच लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत या दोघांचं कौतुक केलं आहे.
करण जोहर किंग खानचं कौतुक करताना लिहितो, “शाहरुख भाई ३३ वर्षे झाली…आणि आज बोलण्यासाठी शब्द नाहीत. कारण, मनात फक्त तुझ्याबद्दल अभिमान आहे. तू साकारलेल्या प्रत्येक भूमिकेमुळे तुला या सिनेविश्वात एक वेगळी ओळख मिळाली. ‘जवान’सह तुझे सगळेच चित्रपट दाखवून देतात की, तू किती उत्कृष्ट अभिनेता आहेस. तू रुपेरी पडद्यावर आल्यावर स्वॅग, चार्म आणि फक्त डोळ्यासमोर SRK चं दिसतो. आज तुझ्या आनंदात आम्ही सगळे सहभागी आहोत…तुला असंच यश मिळत राहो यासाठी आम्ही कायम प्रार्थना करू… खूप खूप अभिनंदन शाहरुख भाई तू या आणि अशा अनेक पुरस्कारांसाठी पात्र आहेस…आणि शेवटी इतकंच म्हणेन पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!”
करण पुढे राणी मुखर्जीबद्दल लिहितो, “माझी प्रिय राणी…तू खरंच रुपेरी पडद्याची राणी आहेस. तू तुझ्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’मधील परफॉर्मन्सने सगळ्यांनाच एक नवीन प्रेरणा दिली आहेस…हे खूप कमी लोक करू शकतात. पण, तू नेहमीच तुझ्या अभिनयाने प्रत्येकाचं मन जिंकून घेतेस. अभिनंदन…तुला आणखी प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत… ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या सिनेमाला पाठिंबा दिल्याबद्दल निर्मात्यांचेही विशेष आभार…तुला खूप खूप शुभेच्छा राणी!”
“तळटीप- मला शाहरुख, राणी आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमासाठी माझा पहिला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला होता तर, आज हे पुरस्कारांचं वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही.” अशी तळटीप करणने या पोस्टवर लिहिली आहे. राणी, करण आणि शाहरुख या त्रिकुटाने अनेक बॉलीवूड सिनेमांसाठी एकत्र काम केलेलं आहे.