Karan Johar recalls trolling for being single parent: ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’ अशा अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी करण जोहर ओळखला जातो. कॉफी विथ करण या शोमुळेदेखील करण जोहर लोकप्रिय ठरला आहे.
दिग्दर्शनाबरोबर करण जोहरने निर्माता म्हणूनदेखील काम केले आहे. अनेकदा तो त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतो. त्याने वजन कमी केल्यानेदेखील त्याची मोठी चर्चा झाली. करण जोहर विविध कारणांमुळे अनेकदा ट्रोलदेखील होत असतो.
“ती कमेंट वाचल्यानंतर मला फार वाईट वाटले”
करण जोहरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे, तर तो अविवाहित आहे आणि त्याला सरोगसीच्या माध्यमातून दोन मुले आहेत. २०१७ मध्ये वयाच्या ४४ व्या वर्षी सरोगसीद्वारे त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यामधील मुलाचे नाव यश आणि मुलीचे नाव रुही, असे आहे. त्याने त्याच्या मुलाचे नाव त्याचे दिवंगत वडील चित्रपट निर्माते यश जोहर यांच्या नावावरून ठेवले आहे. आता एका मुलाखतीत त्याने त्याच्या मुलांबद्दलच्या एका कमेंटबद्दल सांगितले.
मोजो स्टोरीला दिलेल्या मुलाखतीत करण जोहर म्हणाला, “नेटकऱ्याच्या एका कमेंटने मला विचार करण्यास भाग पाडले होते. तशाच आशयाच्या अनेक पोस्टदेखील होत्या. ती कमेंट अशी होती की ,तुझ्या मुलांना आईची माया मिळू शकली नाही. ती कमेंट वाचल्यानंतर मला फार वाईट वाटले. माझ्या सिंगल पॅरेंट होण्याच्या निर्णयावर पहिल्यांदाच माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. ती कमेंट मी सकाळी वाचली होती. मी माझ्या खोलीत होतो.”
“मला रडू आले होते. मी मुलांच्या खोलीत गेलो. त्यावेळी ते फक्त पाच वर्षांचे होते. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना विचारलं की, तुम्ही आनंदी आहात का? पाच वर्षांच्या मुलांना असा प्रश्न विचारणे मूर्खपणाचे आहे; पण मी तो त्यांना विचारला. ते मला हो म्हणाले. मी त्यांना विचारले का? त्यावर माझी मुलं म्हणाली की, बाबा तुमच्यामुळे आम्ही आनंदी आहोत. एका अर्थाने मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. मी सिंगल पॅरेंट असल्याचा मला अभिमान आहे.
जेव्हा पालक-शिक्षक मीटिंगला जातो, तेव्हा मी त्या दोघांच्या आई आणि वडिलांची, अशी दुहेरी भूमिका निभावतो. जुळी मुलं असण्याचा आनंद हाच असतो. मी एकुलता एक मुलगा होतो आणि आता एकटा पालक आहे. मला भावंडं किंवा जोडीदार नाही. पण, मला माझ्या मित्रांकडून नेहमीच पाठिंबा मिळत असतो. ते माझे कुटुंबच आहेत. मी नशीबवान आहे की, मी असे कुटुंब तयार करू शकलो.”
करण जोहर असेही म्हणाला की त्याच्या चुलत बहिणी अनुष्का व प्रियांका या त्याला मुलीप्रमाणे आहेत. तसेच करण जोहरने आलिया भट्टला भेटल्यानंतरदेखील पालकत्वाची भावना मनात निर्माण झाल्याचे म्हटले होते. दरम्यान, आलिया भट्टने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केले आहे.