Kareena Kapoor Diet : करीना कपूरचं डाएट, योगा आणि तिची ‘झिरो साईज फिगर’ हा एकेकाळी खूपच चर्चेचा विषय ठरला होता. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टशन’ चित्रपटासाठी करीनाने फिटनेसवर भरपूर मेहनत घेतली होती. आज बॉलीवूडची बेबो दोन मुलांची आई आहे पण, वयाच्या चाळीशीत सुद्धा करीना डाएट आणि फिटनेसवर विशेष लक्ष केंद्रीत करते. गेल्या १८ वर्षांपासून मराठमोळ्या आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करीना डाएट फॉलो करतेय.

‘टशन’ सिनेमाच्या निमित्ताने ऋजुता दिवेकर आणि करीना यांची पहिली भेट झाली होती. २००९ मध्ये ऋजुता यांनी आहाराविषयीचं त्यांचं ‘डोंट लूज युअर माइंड, लूज युअर वेट’ हे पहिलं पुस्तक लिहिलं होतं. याचं श्रेयही त्या करीनाला देतात. काही दिवसांपूर्वीच ऋजुता यांनी ‘लल्लनटॉप’च्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी करीना नेमकं काय डाएट फॉलो करतेय याविषयी त्यांनी खुलासा केला होता.

करीना सकाळी उठल्यावर सर्वप्रथम रात्री भिजवून ठेवलेले बदाम, मनुका, अंजीर खाते. त्यानंतर नाश्ता करताना पराठे किंवा पोहे खाते. तिच्या दुपारच्या जेवणात डाळ-भाताचा समावेश असतो. संध्याकाळी बेबो क्वचित चीज टोस्ट खाते. अन्यथा आंब्याचा किंवा सीझनल फळांचा मिल्कशेक पिते आणि रात्रीच्या जेवणासाठी पुलाव किंवा तूप घालून केलेली खिचडी खाते. आठवड्यातून पाच दिवस ती सहज खिचडी खाते, असं ऋजुता दिवेकरांनी सांगितलं.

शूटिंगदरम्यान, गरमागरम डाळ-भात सहज उपलब्ध असतो याशिवाय घरूनही सहज बनवून नेता येतो. त्यामुळे बेबो चपाती-भाजीपेक्षा सेटवर डाळभात नेणं जास्त सोयीचं समजते असंही ऋजुता यांनी नमूद केलं. करीनाला खिचडी भात खूप आवडतो त्यामुळे आठवड्यातून चार ते पाच दिवस तिच्या जेवणात खिचडी भाताचा समावेश असतो.

करीनाने देखील स्वत: याबद्दल खुलासा केला होता ती म्हणाली होती की, “माझा स्वयंपाकी सुद्धा कंटाळत असेल कारण, मी रात्रीच्या जेवणात फक्त डाळ-भात खाते, खिचडी भात किंवा फारतर दहीभात असतो. यापेक्षा वेगळं मी काहीच खाऊ शकत नाही. मी आठवड्यातून पाच वेळाही खिचडी भात खाते…आवडीचं खाल्ल्यावरच माणूस आनंदी राहतो असं मला वाटतं. पण, हे सगळं जेवण मी रात्री नाहीतर संध्याकाळी ६:३० पर्यंत जेवते आणि रात्री ९:३० वाजता झोपते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘टशन’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ‘झिरो साईज फिगर’साठी मेहनत घेत असतानाही आवर्जून मी पराठे खायचे असं करीनाने यावेळी सांगितलं. २०२१ मध्ये जेहच्या जन्मानंतर जवळपास ४५ किलो वजन वाढलं होतं. यावेळी करीना प्रचंड चिंतेत होती पण, त्यानंतर पुन्हा एकदा वर्कआऊट करून, डाएटकडे योग्यप्रकारे लक्ष देऊन तिने स्वत:चा फिटनेस जपला असं ऋजुता दिवेकरांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान सांगितलं होतं.