Karisma Kapoor Property: बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर मागील काही महिन्यांपासून एक्स पती संजय कपूरच्या निधनामुळे चर्चेत आहे. उद्योगपती संजय कपूर यांचे घशात मधमाशी अडकल्याने हार्ट अटॅक आल्याने निधन झाले. सध्या संजय कपूर यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून वाद सुरू आहे. संजय कपूर यांच्यासंपत्तीबद्दल सर्वांना माहितीये, पण त्यांची दुसरी पत्नी करिश्मा कपूरची संपत्ती किती? त्याबद्दल जाणून घेऊयात.

संजय कपूर यांनी तीन लग्नं केली. संजय कपूर यांचं पहिलं लग्न नंदिता महतानीशी झालं होतं, पण दोघांचा २००० मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर संजय यांनी २००३ मध्ये दुसरं लग्न बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी केलं. त्यांना समायरा व कियान ही दोन अपत्ये झाली. करिश्मा व संजय यांच्या नात्यात कालांतराने कटुता आणि आणि मग दुरावा आला. त्यानंतर करिश्माने २०१४ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि २०१६ मध्ये ते कायदेशीररित्या विभक्त झाले. करिश्मा आणि संजय यांच्या लग्नाला संपूर्ण बॉलीवूड उपस्थित होतं, त्यामुळे जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.

संजय कपूर हे ऑटो कंपोनंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे चेअरमन होते. ही कंपनी त्याचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी १९९७ मध्ये स्थापन केली होती. सुरिंदर कपूर भारतातील ऑटो कंपोनंट उद्योगातील तज्ज्ञ होते. वडिलांचे निधन झाल्यावर संजय यांनी २०१५ मध्ये मॅनेजिंग डायरेक्टरचा पदभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी देश- विदेशात आपला व्यवसाय वाढवला. सध्या ‘सोना कॉमस्टार’चे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. इथे इलेक्ट्रिक बाईक्ससाठी सुट्या भागांची निर्मिती केली जाते. संजय कपूर यांची एकूण संपत्ती तब्बल ३०,००० कोटी रुपये आहे.

करिश्मा कपूरची संपत्ती किती?

Karisma Kapoor Net Worth: मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्माची एकूण संपत्ती सुमारे १२० कोटी रुपये आहे. करिश्मा चित्रपटांमधून, ब्रँड एंडोर्समेंट्समधून आणि गुंतवणुकीतून कमाई करते. घटस्फोटानंतर करिश्मा कपूरने पुन्हा कामावर लक्ष केंद्रित केलं. ती अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करते, तसेच तिने गुंतवणूकही केली आहे.

करिश्माला संजय कपूर यांनी किती पोटगी दिली होती?

करिश्मा कपूर व संजय कपूर विभक्त झाल्यावर मुलं करिश्माबरोबर राहू लागली. संजय कपूर यांनी करिश्माला तब्बल ७० कोटी रुपये पोटगी दिली होती.

कपूर कुटुंबाची संपत्ती किती?

संपूर्ण कपूर कुटुंबाबद्दल बोलायचं झाल्यास, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कपूर कुटुंब भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. त्यांची एकूण संपत्ती आता २००० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.