बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने आजवर तिच्या अभिनयाने, सौंदर्याने आणि नृत्य कौशल्याने अनेकांनाच मोहित केलं आहे. तिचा प्रत्येक चित्रपट, त्यातील भूमिका आणि तिच्या नृत्याची चाहत्यांच्या मनावरील जादू आजही कायम आहे. या हरहुन्नरी अभिनेत्रीबरोबर काम करण्याची आज प्रत्येक नवख्या कलाकाराची इच्छा असेल. मात्र एका सिनेमात तिच्याबरोबर काम करण्यासाठी बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी नकार दिला होता.
‘दिल तो पागल है’ या सिनेमात माधुरीबरोबर काम करण्यासाठी काही बॉलीवूड अभिनेत्रींनी नकार दिला होता. याबद्दल स्वत: करिश्मा कपूर हिने खुलासा केला होता. २०२४ मध्ये ‘लेडी स्टडी’ ग्रुप या कार्यक्रमात बोलताना करिश्मा म्हणालेली, “‘दिल तो पागल है’साठी प्रत्येक अभिनेत्रीने नकार दिला होता. खरं सांगायचं तर, यात मीसुद्धा आहे. कारण कोणालाच माधुरी दीक्षितबरोबर काम करायचं नव्हतं.”
यापुढे ती म्हणाली होती, “माधुरीबरोबरच्या कामाला नकार हा तिच्याबरोबरची स्पर्धा किंवा मत्सर यामुळे नव्हता, तर माधुरीच्या उत्कृष्ट नृत्यकौशल्यामुळे होता. कोणालाच तिच्याबरोबर नृत्य करायचं नव्हतं. यासाठी मी आधी नकार दिला होता. पण जेव्हा मी पटकथा ऐकली, तेव्हा मला वाटलं की हा चित्रपट मला करायलाच हवा.”
यानंतर ती सांगते की, “माझ्या आईनेही मला यासाठी प्रोत्साहन दिलं आणि नृत्यासाठी मेहनत घ्यायला मदत केली. नंतर हा चित्रपट आयकॉनिक ठरला. यानिमित्ताने शाहरुख, माधुरी आणि यश चोप्रांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली.”
‘दिल तो पागल है’ची आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे, माधुरी दीक्षितच्या भूमिकेसाठी यश चोप्रांनी आधी श्रीदेवीला विचारलं होतं. पण तिला वाटलं की, ही भूमिका तिच्या ‘लम्हे’ या चित्रपटामधील भूमिकेसारखी नाही, म्हणून तिने नकार दिला. नंतर जेव्हा माधुरी दीक्षितला पूजा या भूमिकेसाठी अंतिम करण्यात आलं, तेव्हा दुसरी अभिनेत्री शोधणं यश चोप्रांसाठी अवघड झालं.
या भूमिकेसाठी पहिल्यांदा मनिषा कोईरालाला ऑफर विचारण्यात आलं होतं, पण याला तिने नकार दिला, ज्याचा तिला नंतर पश्चात्तापही झाला. मनिषा कोईरालासह जुही चावला, काजोल आणि रवीना टंडन यांचाही विचार करण्यात आला होता.