Kesari Veer box office collection day 3: सुनील शेट्टी व अभिनेता सूरज पांचोली नुकतेच ‘केसरी वीर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. शुक्रवारी (२३ मे) हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता तीन दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊ.
शुक्रवारी (२३ मे) तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामध्ये ‘भूल चूक माफ’, ‘केसरी वीर’ व ‘कपकपी’ या चित्रपटांचा समावेश आहे. या तीन चित्रपटांपैकी राजकुमार रावच्या प्रमुख भूमिका असलेला ‘भूल चूक माफ’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तीन दिवसांत फक्त ‘इतक्या’ लाखांची कमाई
सुनील शेट्टीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘केसरी वीर’ला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. तीन दिवसांत हा चित्रपट एक कोटीचा टप्पादेखील ओलांडू शकलेला नाही. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त २५ लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३१ लाख; तर तिसऱ्या दिवशी ‘केसरी वीर’ने ३२ लाख इतकी कमाई केली. तीन दिवसांत या चित्रपटाने ८८ लाखांची कमाई केली आहे. तर राजकुमार राव यांच्या भूल चुक माफ या चित्रपटाने तीन दिवसांत २७.७३ कोटींची कमाई केली आहे. त्याबरोबरच ‘कपकपी’ या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. या चित्रपटाने ९२ लाखांची कमाई केली आहे.
सूरज पांचोलीने हिरो या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट फ्लॉफ ठरला होता. आता केसरी वीर या चित्रपटाने ‘हीरो’पेक्षाही कमी कमाई केली आहे. ‘केसरी वीर’च्या तीन दिवसांचे संपूर्ण कलेक्शन हे हीरो चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईपेक्षा कमी आहे. हीरो या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.९० कोटींची कमाई केली होती. ‘केसरी वीर’ने पहिल्या दिवशी फक्त २५ लाखांची कमाई केली. तर पहिल्या आठवड्यात ‘हीरो’ सिनेमाने एकूण २१.२५ कोटींची कमाई केली होती. तर ‘केसरी वीर’ने ८८ लाखांची कमाई केली आहे.
प्रिन्स धिमान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.