ऑगस्ट महिन्यामध्ये आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट टॉम हॅक्स यांच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी सर्वत्र बॉयकॉट बॉलिवूडचे वारे वाहत होते. चित्रपटाचा ट्रेलर ज्या दिवशी प्रदर्शित झाला, त्या दिवसापासून लोक आमिरला सोशल मीडियावर ट्रोल करु लागले. या सर्व परिस्थितीचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर झाला. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

याच सुमारास ‘लाल सिंग चड्ढा’चे दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि आमिर खान यांच्यामध्ये चित्रपटाच्या अपयशावरुन वाद झाला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर लोक त्यांच्याबद्दल खूप काही बोलत होते. या प्रकरणावर मौन सोडत अद्वैतने आमच्यात ‘सर्वकाही आलबेल आहे’, असे म्हटले. त्याने इन्स्टाग्रामवर आमिरबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते दोघे स्विमिंग सूट घातले असल्याचे दिसत आहे. त्यांनी समुद्रामध्ये सर्फिंग करण्यासाठी वापरला जाणारा बोर्ड हातांनी पकडला आहे. या फोटोला त्याने “ज्यांना आमिर सर आणि माझ्यामध्ये वाद झाला आहे असे वाटते अशा लोकांना मी आम्ही जीनी-अलादीन, बालू-मोगली आणि अमर-प्रेम सारखे आहोत हे सांगू इच्छितो”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री वैशाली ठक्करची शेवटची इच्छा पूर्ण, आईला म्हणाली होती…

अद्वैतने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटामध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केले होते. त्यानंतर ‘धोबी घाट’ चित्रपटामध्ये तो कास्टिंग विभागामध्ये कामाला होता. आमिर खान प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटामध्ये त्याने दिग्दर्शन आणि पटकथालेखन केले होते. या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते.

आणखी वाचा – ‘अशी’ होती रिया चक्रवर्तीची तुरुंगातील वागणूक, बाहेर पडताना कैद्यांना वाटली मिठाई आणि…

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे आमिर खानच्या चित्रपटांच्या तारखा पुढे धकलण्यात आल्या. गुलशन कुमार यांच्या चरित्रपटामध्ये तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याशिवाय ‘कॅम्पियन्स’ या स्पॅनिश चित्रपटाच्या रिमेकमध्येही तो दिसणार आहे.