९० च्या दशकात बॉलिवूड चित्रपटातून कित्येक प्रेक्षकांना स्वतःच्या अदांनी आणि अभिनयाने भुरळ घालणाऱ्या दिव्या भारतीला आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. वयाच्या १९ व्या वर्षीच तिचा मृत्यू कित्येकांना चटका लावून गेला. आज दिव्याची पुण्यतिथी. तिचा मृत्यू अपघात होता की घातपात हे गूढ कायम आहे. १९९१ ते १९९३ या दोन वर्षांच्या कालावधीत दिव्याने १५ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. शाहरुख खानच्या ‘दिवाना’ या चित्रपटात दिव्याने काम केलं तसेच तिने ‘शोला और शबनम’ या चित्रपटात गोविंदाबरोबर काम केलं.
याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिव्याने एका बॉलिवूड निर्मात्याशी गुपचुप लग्न केल्याचं समोर आलं होतं. निर्माता साजिद नाडियाडवाला याच्याशी दिव्याने गुपचुप लग्न केलं होतं. १० मे १९९२ रोजी या दोघांनी एक खासगी सोहळा आयोजित केला होता आणि लग्नगाठ बांधली होती, आणि यानंतर बरोबर एक वर्षाने ५ एप्रिल १९९३ रोजी दिव्याचा मृत्यू झाला.
आणखी वाचा : दादासाहेब फाळके पुरस्कारांबद्दल कंगना रणौतने व्यक्त केली नाराजी; पोस्ट शेअर करत नेपोटीजमवर टीका
दिव्याने तिच्या या लग्नाबद्दल तिच्या वडिलांपासूनही लपवून ठेवलं होतं. दिव्याची आई मीता भारती यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या, “साजिद हा बऱ्याचदा ‘शोला और शबनम’च्या सेटवर गोविंदाला भेटायला येत असे, तेव्हाच या दोघांची भेट झाली, पहिल्या भेटीनंतरच दिव्याच्या मनात साजिदने घर केलं होतं. मला या दोघांच्या नात्याबद्दल काहीच समस्या नव्हती, पण दिव्याचे वडील याविरोधात होते. १८ वर्षं पूर्ण होताच दिव्याने मला फोन करून लग्न करत असल्याची बातमी दिली आणि साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी माझ्याकडे विनंती केली, पण तेव्हा मी तिला नकार दिला, तिने ही गोष्ट प्रथम तिच्या वडिलांना सांगावी अशी माझी इच्छा होती.”
दिव्याच्या वडिलांना तिच्या या लग्नाबद्दल बऱ्याच महिन्यांनी समजलं. इतकंच नव्हे तर लग्नानंतरसुद्धा ती बरेच दिवस तिच्या आई वडिलांबरोबर राहत होती, शिवाय साजिदलासुद्धा ती क्वचितच भेटत असे. दिव्या भारती ५ एप्रिल १९९३ ला वर्सोवा येथील तिच्या फ्लॅटच्या गॅलरीतून खाली पडली आणि त्यातच तिचा अंत झाला. दिव्या भारतीचा मृत्यू ज्याप्रकारे झाला त्यानंतर त्या घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तिच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे.