Madhuri Dixit Biggest Fan : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचे जगभरात असंख्य चाहते आहेत. तिचं सौंदर्य, तिचं हास्य आणि तिच्या नृत्यशैलीची भुरळ आजही प्रत्येकाला पडते. लग्नानंतर माधुरीने काही वर्षे बॉलीवूडमधून ब्रेक घेतला होता मात्र, आता ती पुन्हा एकदा सिनेविश्वात सक्रिय झाली आहे. ९० च्या दशकात एक काळ असा होता जेव्हा फक्त चाहतेच नाहीतर सिनेविश्वातील कलाकारांना सुद्धा माधुरीच्या सौंदर्याची भुरळ पडली होती.

बॉलीवूडमध्ये असे एक आर्टिस्ट होते ज्यांनी माधुरीचा एक सिनेमा तब्बल ७३ वेळा पाहिला होता. याबद्दल जाणून घेऊयात…

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय व जागतिक दर्जाचे चित्रकार एम. एफ. हुसेन हे माधुरीचे डाय हार्ड फॅन होते. माधुरीचा सिनेमा पाहण्यासाठी त्यांनी संपूर्ण थिएटर बूक केलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांनी माधुरीचा ‘हम आपके है कौन’ सिनेमा तब्बल ७३ वेळा पाहिला होता.

मकबूल फिदा हुसेन असं एम. एफ. हुसेन यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता. त्यांनी अनेक सिनेमांसाठी पटकथालेखक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. माधुरीला घेऊन एखादा सिनेमा करायचा असं त्यांनी ठरवलं होतं. यानुसार त्यांनी २००० मध्ये ‘गजगामिनी’ सिनेमा बनवला. यात माधुरी प्रमुख भूमिकेत होती. कामना चंद्रा यांनी ‘गजगामिनी’ चित्रपटाचं सहलेखन केलं होतं. या सिनेमात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी हे कलाकार देखील होते. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही.

एम.एफ. हुसेन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला मुंबईत सिनेमांची पोस्टर्स तयार केली होती. १९६७ मध्ये, त्यांना ‘थ्रू द आयज ऑफ अ पेंटर’ ( प्रायोगिक सिनेमा ) यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, २००४ मध्ये तब्बू आणि कुणाल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मीनाक्षी: अ टेल ऑफ थ्री सिटीज’ या सिनेमाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा कान्स महोत्सवात प्रदर्शित झाला होता. ९ जून २०११ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी एम.एफ. हुसेन यांचं निधन झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या ३’ सिनेमात झळकली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता लवकरच माधुरी ‘मिसेस देशपांडे’ या थ्रिलर सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.