Actress Madhuri Dixit : मनोरंजनसृष्टीतील सगळ्याच अभिनेत्री स्किनकेअर रुटिन, आपलं डाएट याकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे सेटवर जाताना किंवा घराबाहेर पडताना या अभिनेत्री आपल्या बॅगेत कोणकोणत्या जीवनावश्यक वस्तू ठेवतात हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. बॉलवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचं स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे आणि याच चॅनेलवर काही वर्षांपूर्वी माधुरीने ‘What’s in my bag’ म्हणजेच ‘माझ्या बॅगेत काय-काय आहे?’ असं कॅप्शन देत खास व्हिडीओ शेअर केला होता.

माधुरीचा हा व्हिडीओ पाहून चाहते तिच्या आणखीच प्रेमात पडले आहेत. “द बेस्ट बॅग”, “सगळ्या मुलींनी अशाप्रकारे सगळ्या वस्तू आपल्या बॅगेत ठेवाव्यात”, “नो शो ऑफ…सेलिब्रिटी असण्याचा कोणाताच आविर्भाव नाही बेस्ट बॅग” अशा असंख्य प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. आता पाहुयात माधुरीच्या बॅगेत एवढं काय असतं? की सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं आहे.

माधुरी म्हणते, “माझ्या बॅगेत इतक्या वस्तू असतात की, माझ्या टीमला वाटतं माझ्याकडे घरातील सगळ्याच वस्तू असतात.” अभिनेत्री सर्वात आधी तिच्या पर्समधून टिश्यू पेपर बाहेर काढते. ती म्हणते, “टिश्यू पेपर कायम माझ्याजवळ असतात. कारण, गाडीतून प्रवास करताना माझ्या मुलांच्या हातून काही ना काही सांडतं आणि ते विचारू लागतात आई तुझ्याकडे टिश्यू आहे का? त्यामुळे टिश्यूपेपर नेहमी बॅगेत ठेवावे लागतात.”

माधुरी बॅगेतमधील दुसरी वस्तू दाखवते ती म्हणजे ‘नेल किट’. अभिनेत्री तिच्या नखांची खूप काळजी घेते त्यामुळे तिच्या बॅगेत कायम लहानसा नेलकिटचा पाऊच असतो.

अभिनेत्रीच्या बॅगेत नेहमी क्रेडिट कार्ड, एटिएम कार्ड आणि पैसे ठेवण्यासाठी छोटं पाऊच असतं. यासह तिच्या बॅगेत सुका मेवा असतो. माधुरी आरोग्याच्या दृष्टीकोनातून तिच्या बॅगेत कायम एक महत्त्वाची गोष्ट ठेवते ती म्हणजे ‘टॉयलेट सीट सॅनिटायझर’. “अनेकदा शूटिंगसाठी बाहेर गेल्यावर आपल्याला वेगवेगळे वॉशरूम वापरावे लागतात…आणि मला याची भीती वाटते. त्यामुळे टॉयलेट सीट सॅनिटायझर बॅगेत असतंच” असं माधुरीने सांगितलं.

याचदरम्यान माधुरीला तिच्या बॅगेत एक खास गोष्ट सापडते. ती म्हणजे तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांचा पासपोर्ट साइज फोटो. अर्थात हा फोटो बॅगेत कसा आला हे माधुरीला माहिती नव्हतं. पण, नवऱ्याचा फोटो पाहताच तिच्या चेहरा खुलतो, ती काहिशी लाजते आणि म्हणते, “हा फोटो बॅगेत कसा आला मला खरंच नाही. Anyways राम,आय लव्ह यू” आणि यानंतर माधुरी श्रीराम नेनेंचा फोटो सगळ्या वस्तूंसह न ठेवता बेडवर साइडला ठेवते.

याशिवाय तिच्या बॅगेत हँड सॅनिटायझर, मास्क, घराच्या किल्ल्या, मॉइश्चरायझर, लहान वही आणि पेन, कंगवा, सनग्लासेस, एअरपॉड्स, फ्लॉस ( जेवणानंतर दात स्वच्छ करण्यासाठी ), लिपस्टिक, लिपबाम, हेअर क्लिप, मिनी परफ्युम, पिलो मिस्ट, शुगर सब्स्टिट्यूट, दोन प्रकारच्या सनस्क्रीन, मायग्रेनच्या गोळ्या या गोष्टी असतात.