Madhuri Dixit’s competition with 90’s actress: माधुरी दीक्षित ही बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीला करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला.

परंतु, ‘राम लखन’, ‘प्रेम प्रतिज्ञा’, ‘त्रिदेव’, ‘महासंगम’, ‘किशन कन्हैया’, ‘जमाई राजा’, ‘देवदास’, ‘हम आपके है कौन’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘मृत्युदंड’, अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

विशेष म्हणजे अभिनयच नाही, तर तिचे नृत्य आणि सौंदर्याचीदेखील चाहत्यांवर भुरळ पडली होती. आज इतक्या वर्षांनंतरही अभिनेत्रीची लोकप्रियता तशीच टिकून आहे. आजही तिला प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळते. अभिनेत्री चित्रपट, रिअॅलिटी शो, तसेच सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येते.

माधुरी दीक्षितची ‘या’ अभिनेत्रीबरोबर व्हायची तुलना

पण, तुम्हाला माहीत आहे का, एक काळ असा होता, जेव्हा माधुरी दीक्षित व लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री या दोन्ही अभिनेत्रींची मोठ्या प्रमाणात तुलना होत होती.

मीनाक्षी शेषाद्रीनेदेखील ‘दामिनी’, ‘हीरो’, ‘मेरी मांग’ अशा गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर या दिग्गज अभिनेत्यांबरोबर तिने काम केले. बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्री म्हणून मीनाक्षीची ओळख आहे. त्यामुळे त्या काळात माधुरी दीक्षित व मीनाक्षी शेषाद्री यांची तुलना केली जात होती.

या दोन्ही अभिनेत्रींनी १९८६ साली प्रदर्शित झालेल्या स्वाती या चित्रपटात एकत्र काम केले होते. क्रांती कुमार यांनी हा रोमँटिक चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटात मीनाक्षी शेषाद्रीने प्रमुख भूमिका साकारली होती; तर माधुरी दीक्षितने मीनाक्षीच्या सावत्र बहिणीची भूमिका साकारली होती.

एकदा बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मीनाक्षी शेषाद्रीने माधुरी दीक्षितबरोबर होणाऱ्या तुलनेबाबत वक्तव्य केले होते. अभिनेत्री म्हणालेली, “मी कधीच माधुरीसारखी होऊ शकत नाही. माधुरीसुद्धा माझ्यासारखी असूच शकत नाही. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही.”

दरम्यान, सध्या मीनाक्षी शेषाद्री अभिनय क्षेत्रापासून दूर असल्याचे पाहायला मिळते; तर माधुरी दीक्षित २०२४ मध्ये भुल भुलैय्या ३ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.