Madhuri Dixit : यंदा मे महिन्यातच मुंबईसह राज्यभरात मान्सून दाखल झाला आहे. अनेकांना पावसाळा ऋतू विशेष आवडतो. पावसाच्या सरी, निसर्गरम्य वातावरण, सुंदर धबधबे पाहण्यासाठी अनेकजण सुट्ट्या काढून फिरायला जातात. सामान्य लोकांपासून ते मनोरंजन विश्वातील कलाकारांपर्यंत सगळेच सध्या पावसाचा आनंद लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे.
बॉलीवूडची स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित सुद्धा आपल्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढत, पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईतील एका खास ठिकाणी पोहोचली होती. माधुरीने याचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने मरुन कलरचा कॉर्सेट ड्रेस घातल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात माधुरी फिरायला गेली होती. यादरम्यान तिने हा सुंदर व्हिडीओ काढला.
माधुरीकडे या व्हिडीओला तिच्या गाजलेल्या ‘हम आपके है कौन’ चित्रपटातील ‘ये मौसम का जादू है मितवा’ हे गाणं लावलं आहे. माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुंदर व्ह्यू व आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळेच ‘धकधक गर्ल’ने पावसाळी रील्स व्हिडीओला एकदम परफरेक्ट गाणं लावलंय असं नेटकरी कमेंट्समध्ये बोलत आहेत.
माधुरीने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “मान्सून डायरीज, मॅजिक ऑफ द सीझन” असं म्हटलं आहे. तसेच अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. शक्ती मोहनने या व्हिडीओवर, “पाऊस म्हणजे प्रेम…मॅम एन्जॉय करा” अशी कमेंट केली आहे. तर अन्य नेटकऱ्यांनी, “किती गोड व्हिडीओ आहे”, “क्वीन फॉर रीझन”, “माधुरी रील्स व्हिडीओ असो किंवा चित्रपट सर्वत्र तिची जादू क्रिएट करते”, “माय फेव्हरेट…मॅम सुंदर दिसताय”, “आजच्या दिवसातला सर्वात सुंदर व्हिडीओ” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी माधुरीच्या पोस्टवर दिल्या आहेत.
दरम्यान, माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, काही महिन्यांपूर्वीच ती ‘भुल भुलैय्या ३’ सिनेमात झळकली होती. या चित्रपटासाठी ‘धकधक गर्ल’ला नुकताच सहायक अभिनेत्रीचा नुकताच ‘झी सिने अवॉर्ड’ मिळाला. आता लवकरच माधुरी ‘मिसेस देशपांडे’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.