महेश भट्ट यांचं पहिलं लग्न किरण भट्टशी झालं होतं. त्यांना पहिल्या लग्नापासून पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन अपत्ये होती. त्यानंतर महेश भट्ट सोनी राजदान यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ‘द पूजा भट्ट शो’ मध्ये बोलताना महेश भट्ट त्यांच्या आयुष्यातील त्या टप्प्याची आठवण काढून रडले. त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या निर्णयावेळी पूजा भट्ट लहान होती, पण तरीही ती समजूतदारपणे वागली आणि तिने सहानुभूती दाखवली होती, असं महेश म्हणाले.
पूजाशी बोलताना महेश भट्ट म्हणाले, “तुला आठवतंय जेव्हा मी तुला सांगितलं होतं की मी इथे राहणार नाही. आणि याचा अर्थ मी तुला स्वीकारत नाही, असा घेऊ नकोस. माझ्या आयुष्यात आणखी एक स्त्री आहे, पण मी तुझ्यावरही प्रेम करतो. मी नेहमीच तुझ्या आईची आणि या घराची काळजी घेईन.” असं म्हटल्यानंतर महेश भट्ट शोमध्ये रडले. “त्यावेळी तू जी प्रतिक्रिया दिली होतीस, त्याबद्दल मी तुझे आभार मानेन तितके कमी आहेत. कारण तू माझ्याकडे पाहिलं आणि मला वाटलं की तू माझ्याबद्दल मत तयार केलं नाही,” असं महेश म्हणाले. तर आपण जज न केल्याचं पूजाने देखील कबूल केलं.
महेश भट्ट यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला सोनी राजदानबरोबरच्या नात्याबद्दल सांगण्यापूर्वीच पूजाला सांगितलं होतं. ती आठवण काढत पूजा म्हणाली, “तुम्ही माझ्या बेडच्या कडेला बसले होता आणि तुमच्या आयुष्यात एक स्त्री आहे, तिच्याशी लग्न करून तुम्ही निघून जाणार, असं मला सांगितलं होतं. माझ्या आईला सांगण्यापूर्वीच तुम्ही मला हे सांगितलं होतं. त्यावेळी तुम्ही मला इतकी प्राथमिकता दिली होती, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते.”
सोनी राजदानने मागितली होती पूजाची माफी
महेश यांनी सोनी राजदानशी दुसरं लग्न केल्यावर पूजाचे वडिलांशी चांगले संबंध होते. सावत्र आईशी तिची मैत्री झाली. सोनी राजदान यांनी महेश भट्ट यांच्याशी लग्न केल्यावर पूजावर झालेल्या परिणामाबद्दल तिची माफी मागितली होती. “दोघांच्या लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी, मी सोनीबरोबर ‘लव्ह अफेअर’ नावाच्या चित्रपटासाठी रेकी केली होती. तिने मला म्हटलं होतं की तिला खूप अपराधी वाटत होतं. याबद्दल तिने जाहिरपणे कबुली दिली होती. मी तिला म्हणाले, ‘सोनी, ही तुझी चूक नाही, तू त्याला आमच्यापासून दूर नेऊ शकली नसतील.’ म्हणून तू म्हणतेय त्यावर मला विश्वास आहे,” असं पूजा भट्टने नमूद केलं.
महेश भट्ट व सोनी राजदान यांनी १९८६ साली लग्न केलं होतं. या लग्नापासून त्यांना शाहीन भट्ट व आलिया भट्ट या दोन मुली आहेत.