Heeramandi Fame Actress Talk’s About Yash Chopra : यश चोप्रा हे बॉलीवूडमधील मोठं नाव. ९० च्या काळात त्यांनी एकापेक्षा एक अशा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. आज ते जरी हयात नसले तरी अनेक कलाकार मंडळी तसेच प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांबद्दल बोलताना दिसतात. अशातच अभिनेत्री मनीषा कोईरालाने त्यांच्या चित्रपटाला नकार दिल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

यश चोप्रा यांच्या चित्रपटात काम करायला मिळणं ही तशी कलाकारांच्या दृष्टीने मोठी बाबच म्हणायला हरकत नाही, कारण ते इंडस्ट्रतील नामांकित दिग्दर्शक व निर्मात्यांपैकी एक होते. ‘काला पत्थर’, ‘वक्त’, ‘चांदनी’, ‘सिलसिला’, ‘दिवार’, ‘दिल तो पागल हैं’, ‘विर झारा’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. त्यांनी लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. याबद्दल स्वत: अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

मनीषा कोईरालाने ‘फिल्मी शिल्मी’ पॉडकास्टला मुलाखत दिली. यामध्ये तिने यश चोप्रांबद्दल सांगितलं आहे. त्यांच्याबरोबर काम न करता आल्याची खंत अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. ती म्हणाली, “लहान असताना मी जेव्हा ‘चांदनी’ आणि ‘लम्हे’ हे चित्रपट बघायचे, तेव्हापासून मला यश चोप्रांबरोबर काम करण्याची इच्छा होती. मला त्यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींबरोबर काम करता आलं नाही, जे स्त्रियांना इतकं सुंदर, ग्लॅमरस आणि सुरेल गाण्यांमधून सादर करायचे.”

मनीषा कोईरालाने व्यक्त केली खंत

मनीषा कोईरालाने तिने यश चोप्रा यांच्या चित्रपटाला नकार दिल्याची खंत व्यक्त केली. ती म्हणाली, “जेव्हा त्यांनी मला चित्रपटासाठी विचारलं तेव्हा मी स्वत:वरच्या अविश्वासामुळे चित्रपटाला नकार दिला. पण, मला त्याची खंत आहे की मी त्यांच्या चित्रपटाचा भाग होऊ शकले नाही.” ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार त्यांनी ‘दिल तो पागल हैं’ या चित्रपटासाठी मनीषा कोइरालाला विचारलं होतं, ज्यामध्ये नंतर करिश्मा कपूरने काम केलं आणि तिला त्यातील भूमिकेसाठी पुरस्कारही मिळाला.

१९९७ साली आलेल्या या चित्रपटासाठी फक्त मनीषा कोईरालाच नव्हे, तर जुही चावला, काजोल, उर्मिला मातोंडकर यांनाही विाचाणा झालेली. परंतु, यातील सगळ्यांनीच नकार दिला. यामध्ये माधुरी दीक्षित शाहरुख खानसह मुख्य भूमिकेत होती, तर करीश्माने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारलेली.