हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकू म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. नुकतंच मनोज बाजपेयी यांनी राजकारणात प्रवेश करण्याबाबत मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा- “शाहरुखने ‘पहेली’ची कथा ऐकल्यावर सिगारेट शिलगावली अन्…” अमोल पालेकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा
राजकारणात येण्याबाबत बाजपेयी म्हणाले, “मी अभिनेता आहे आणि अभिनेताच राहणार. राजकारणात येण्याचा प्रश्नच येत नाही. खात्रीने सांगतो मी राजकारणात येणार नाही.” बाजपेयी हे बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेलवा गावचे रहिवासी आहेत. गेल्या वर्षी १८ सप्टेंबर रोजी त्यांनी लालू प्रसाद यांची पाटणा येथील त्यांच्या घरी भेट घेतली होती. तेजस्वी यादवने या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला होता. त्यानंतर बाजपेयी राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, बाजपेयी यांच्या उत्तरानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
भोजपुरी चित्रपटात काम करण्याबाबतही बाजपेयी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. बाजपेयी म्हणाले, “मला भोजपुरी सिनेमाचा भाग व्हायला आवडेल. पण चांगली स्क्रिप्ट असणं आवश्यक आहे. जेव्हा मला चांगली स्क्रिप्ट मिळेल तेव्हा मी भोजपुरी सिनेमात नक्की काम करेन.”
हेही वाचा- आशिष विद्यार्थी यांनी पहिल्यांदाच शेअर केला दुसऱ्या पत्नीबरोबरचा फोटो, म्हणाले…
मनोज बाजपेयी यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर त्यांचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट सुरुवातीला ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. आता तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. याबरोबरच मनोज यांच्या ‘द फॅमिलीमॅन सीझन-३’ या वेब सीरिजची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.