Manoj Bajpayee On Shah Rukh Khan National Award : ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अ‍ॅटलीच्या ‘जवान’ चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शाहरुखच्या आयुष्यातील हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार. शाहरुखला ‘जवान’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला.

सोशल मीडियावर अभिनेत्याचं कौतुक करणाऱ्या अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. शाहरुख असंख्य चाहत्यांनी या पुरस्काराबद्दल त्याचं कौतुक केलं. मात्र, काही प्रेक्षकांना हा निर्णय न्याय्य वाटला नाही. त्यांच्या मते, ‘सिर्फ एक बंदा काफ़ी है’ या चित्रपटात मनोज बाजपेयी यांचा अभिनय जास्त प्रभावी होता. त्यामुळे पुरस्कार त्यांनाच मिळायला हवा होता. राष्ट्रीय पुरस्कारावरून होणाऱ्या तुलनेवर आणि शाहरुखला मिळालेल्या पुरस्कारावर स्वत: मनोज बाजपेयी यांनी आता त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, याबद्दल मनोज बाजपेयी म्हणाले, “ही चर्चा निरर्थक आहे. तो विषय आता संपला आहे. ‘सिर्फ एक बंदा काफ़ी है’ हा मा‍झ्या करिअरमधील एक खास चित्रपट होता, जसा ‘जोरम’ सुद्धा होता. हे दोन्ही चित्रपट मा‍झ्या करिअरमधील नेहमीच महत्त्वाचे सिनेमे असतील. मी अशा गोष्टींवर चर्चा करत नाही, कारण अशा चर्चांना काही अर्थ नसतो. जे झालं ते झालं… आता ते तिथंच सोडायला हवं.”

राष्ट्रीय पुरस्कारांचा दर्जा कमी होत चालल्यावरही मनोज बाजपेयी यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. आधी तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते असलेले मनोज याबद्दल म्हणाले, “फक्त राष्ट्रीय पुरस्कारच नाहीत, तर अनेक सन्माननीय पुरस्कार संस्थांनी आपली कार्यपद्धती पुन्हा तपासून पाहायला हवी. मा‍झ्या बाबतीत सांगायचं तर, मी माझा सन्मान जपतो. मी चित्रपट निवडताना फार जबाबदारीने निर्णय घेतो. पण प्रत्येक संस्थेने आपली प्रतिष्ठा टिकवणं हे त्यांचंच काम आहे, ते माझं काम नाही. जर कुणी आपला सन्मान गमावत असेल, तर त्यांनाच त्याचा विचार करायला हवा.”

शाहरुख खान इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे मनोज बाजपेयी यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “विविध भाषांतील आणि शैलींतील चित्रपट व अभिनय पाहता, पुरस्कार समारंभ ही संकल्पनाच त्यांना योग्य वाटत नाही. याबद्दल ते म्हणतात, “माझ्यासाठी पुरस्कार समारंभ ही संकल्पनाच चुकीची आहे. मी केवळ आयोजकांचा आदर म्हणून अशा कार्यक्रमांना उपस्थित राहतो. पण पुरस्कार मिळाल्यावर त्याला फारसं गांभीर्याने घेत नाहीत. पुरस्कार फक्त घरात ठेवायची एक शोभेची वस्तू असते. रोज त्याच्यासमोर उभं राहून ‘वा! मला मिळाला’ असं कोणी म्हणत नाही.”

दरम्यान, मनोज बाजपेयी याआधी तीनवेळा राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांना त्यांच्या पदार्पणातील ‘सत्या’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर पिंजर (२००३) आणि अलिगढ (२०१६) या चित्रपटांसाठीही त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.