मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना ओळखले जाते. उषा नाडकर्णी या आज त्यांचा ७८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्या बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावूक झाल्या.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या घरात सुशांतचा मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर चाहत्यांना जबर धक्का बसला होता. नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी सुशांत सिंह राजपूतबद्दल प्रतिक्रिया दिली.
आणखी वाचा : Video : “तुला बघते थांब…”, मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचं भर सेटवर भांडण, व्हिडीओ आला समोर
“‘पवित्र रिश्ता’ ही मालिका जेव्हा सुरु झाली, तेव्हा दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्यावेळी कोणाला तरी माझा वाढदिवस आहे, हे समजलं आणि त्यांनी मला थांबवून ठेवलं. केक आणला आणि रात्री तो कापला, तेव्हा एकदा सेलिब्रेशन झालं होतं. त्यानंतर जेव्हा आमची मालिका संपली तेव्हा बोंबाबोंब करुन माझा वाढदिवस साजरा केला होता”, असे उषा नाडकर्णींनी सांगितले.
“मला पवित्र रिश्ता या मालिकेतील सर्व कलाकारांची आठवण येते. ती मालिका आम्हा सर्वांमुळे झाली. त्या मालिकेच्या नावात रिश्ता होतं आणि आम्ही साडेपाच वर्ष एकत्र होतो. त्यावेळी आमचं एक कुटुंब झालं होतं. फक्त सुशांत गेला त्याचं खूप वाईट वाटतं.
पोराचं चांगलं चालू होतं. त्याचं खूप वाईट झालं, असं व्हायला नको होतं. काही लोक फार नालायक असतात. आयुष्यात अशी माणसं भेटतात. पण ज्याने त्याचं हे केलं ना, त्यांना देव शिक्षा देणारच. ते बघायला मी असेन किंवा नसेन. पण त्यांना शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. कितीही पैसे दाबून तुम्ही थांबवा, पण देवाचे डोळे बंद होत नाहीत. मला अनेकदा असा अनुभव आला आहे. आपल्यालाही जे लोक करतात, त्यांना देव योग्य वेळी शिक्षा देतो”, असेही त्यांनी म्हटले.
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य
दरम्यान बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. त्याच्या आत्महत्येनं बॉलिवडूच नव्हे, तर सगळेच हादरले होते. त्याच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का होता.