१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या एन चंद्रा यांच्या ‘तेजाब’ या ब्लॉकबस्टर रोमँटिक अॅक्शन चित्रपटातील कलाकारांच्या निवडीबद्दल पुन्हा चर्चा होत आहे. या चित्रपटासाठी आपण पहिली पसंती असल्याचा आदित्य पांचोलीने दावा केला होता. नेपोटिझममुळे सिनेमातून काढण्यात आलं, असा आरोप त्याने केला होता. चित्रपटाची निर्मिती चंद्रा यांनी केली असली तरी, निर्माते बोनी कपूर यांच्यामुळे आपल्या जागी त्यांचा धाकटा भाऊ अनिल कपूर यांना मुख्य भूमिकेत घेतल्याचं पांचोलीने म्हटलं होतं.
‘तेजाब’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या कास्टिंगची गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. सुरुवातीला या भूमिकेसाठी मीनाक्षी शेषाद्रीला घेतलं जाणआर होते. कारण १९८३ मध्ये सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटातून जॅकी श्रॉफबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी मीनाक्षी १९८० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. ती १९८८ मध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘शहेनशाह’ या चित्रपटातही काम करत होती, त्यावेळी तिला ‘तेजाब’ चित्रपटासाठी विचारणा झाली होती.
निर्माते एन चंद्रा यांनी यासंदर्भात मीनाक्षीबरोबर बरेच महिने चर्चा केली होती. पण तिचं मानधन जास्त होतं, निर्माते तेवढं मानधन द्यायला तयार नसल्याने ‘तेजाब’मधून तिला वगळण्यात आलं. पुढे ही भूमिका माधुरी दीक्षितने केली. माधुरी व मीनाक्षी यांनी १९८६ साली आलेल्या ‘स्वाती’ या रोमँटिक सिनेमात काम केलं होतं. या चित्रपटात मीनाक्षी मुख्य भूमिकेत तर माधुरी तिच्या सावत्र बहिणीच्या भूमिकेत होती. ‘तेजाब’मध्ये मीनाक्षीला रिप्लेस केल्यावर माधुरी रातोरात स्टार झाली. या सिनेमातील ‘एक दो तीन चार’ गाण्याने तर धुमाकूळ घातला होता.
कधीच रिलीज झाला नाही चित्रपट
१९८९ मध्ये ‘शनाख्त’ चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान माधुरी व मीनाक्षी यांच्यातील दुरावा आणखी वाढला. कारण दिग्दर्शक टिनू आनंद यांनी मीनाक्षीला सेकंड लीड तर डिंपल कपाडियाला मुख्य भूमिकेत घेतलं होतं. पण डिंपलने सिनेमा सोडला, त्यानंतर तिच्या जागी आनंद यांनी माधुरीला मुख्य भुमिकेत घेतलं. मीनाक्षीला माधुरीला मुख्य भूमिकेत घेतलेलं आवडलं नाही, त्यामुळे तिने चित्रपटातून काढता पाय घेतला. या सिनेमात माधुरी व अमितआभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण हा चित्रपट कधीच रिलीज होऊ शकला नाही.
दामिनीच्या कास्टिंगची गोष्ट
राजकुमार संतोषी यांच्या १९९३ च्या ‘दामिनी’ या चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान एक ट्विस्ट आला. दिग्दर्शक राजकुमार संतोषी मीनाक्षी शेषाद्रीच्या प्रेमात होते. त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली आणि सनी देओलबरोबर दामिनी सिनेमाची ऑफर दिली. पण मीनाक्षीने लग्नाचा प्रस्ताव नाकारला. यामुळे राजकुमार संतोषी यांनी मीनाक्षीला काढून इतर अभिनेत्रींना ऑफर दिली. पण माधुरी दीक्षितसह अनेक अभिनेत्रींनी ही ऑफर नाकारली, त्यामुळे शेवटी राजकुमार संतोषींना मीनाक्षी शेषाद्रीशिवाय पर्याय उरला नाही. ‘दामिनी’ हा मीनाक्षीच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला.
माधुरी दीक्षितबद्दल मीनाक्षी शेषाद्री म्हणालेली…
“सर्वांनी मला सपोर्ट केला आणि म्हटलं, ‘नाही, आम्हाला काहीतरी खूप चुकीचं वाटतंय. आम्ही ही ऑफर स्वीकारू शकत नाही. मीनाक्षी या सिनेमात काम करेल, पण आम्ही हा चित्रपट करू शक नाही, माफ करा.’ मला वाटतं की हा तोच तो काळ होता जेव्हा माझ्या प्रत्येक महिला सहकाऱ्याबद्दल माझा आदर खूप वाढला होता,” असं झूमशी दिलेल्या मुलाखतीत मीनाक्षी शेषाद्री म्हणाली होती. “मला खात्री आहे की दामिनीला नकार देणाऱ्या अभिनेत्रींपैकी माधुरी एक होती. मला इतर नावांबद्दल १००% खात्री नाही,” असंही मीनाक्षी शेषाद्रीने नमूद केलं होतं.
