दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने सध्या एका मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींबद्दल खुलासे केले आहेत. चित्रपटक्षेत्रातील त्याचा अनुभव, नेपोटीजम आणि अशा बऱ्याच गोष्टींचा त्याने या मुलाखतीमध्ये उलगडा केला आहे. त्याने केलेली ही वक्तव्य ऐकून बरीच लोक आश्चर्यचकित झाली आहेत.

मिमोहच्या म्हणण्यानुसार त्याचे वडील मिथुन यांची दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी आणि अमिताभ बच्चन यांच्याशी चांगली मैत्री होती, पण हीच मैत्री पुढच्या पिढीमध्ये बघायला मिळाली नाही. तरुणपणी मिमोह उटी येथे रहात असल्याने चित्रपटसृष्टीतील स्टार लोकांच्या मुलांबरोबर त्याने कधीच जास्त वेळ घालवला नाही.

आणखी वाचा : ७२ व्या वर्षीही सुपरहीट चित्रपट देणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांचा लेक मात्र ठरला सुपरफ्लॉप; पहिल्याच चित्रपटाने कमावले ‘इतके’ रुपये

याबद्दल मिमोह मुलाखतीमध्ये म्हणाला, “कोणत्याही स्टारकीडशी माझी मैत्री नाही. रणबीर कपूरसुद्धा मला एका पुरस्कार सोहळ्यातच भेटला होता. तीच आमची एकमेव भेट, तेव्हासुद्धा आमच्यात फार संभाषण झालेलं नाही.” इतकंच नव्हे तर मिमोह चित्रपटात येण्यामागील कारण हृतिक रोशन होतं, पण तब्बल १५ वर्षात चित्रपटसृष्टीचा एक भाग असूनही मिमोह आजवर आपल्या रोल मॉडेलला हृतिक रोशनला भेटलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी मिमोह म्हणाला, “हृतिकचं काम मला प्रचंड आवडतं. मी आज इंडस्ट्रीमध्ये त्याच्यामुळेच आहे, पण मी आजवर त्याला भेटलेलो नाही. माझी आणि राकेश रोशन यांची भेट झाली आहे, पण मी कधीच त्या गोष्टीचा ध्यास धरला नव्हता.” मिमोहचा ‘जिम्मी’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्याचदरम्यान रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि रणबीर कपूर हे इंडस्ट्रीत आले होते. त्यांच्याबद्दल बोलताना मिमोह म्हणाला, “ही लोक माझ्यापेक्षा बरेच पुढे गेले आहेत, मी त्यांना शुभेच्छा देतो. पण मलाही कधी कधी त्यांच्याबद्दल इर्षा वाटते, शेवटी मीसुद्धा एक माणूसच आहे.” मिमोह नुकताच नवाजुद्दीनच्या ‘जोगीरा सारा रा रा’मध्ये झळकला.