Shubha Khote on Mehmood: मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखले जाते. दिग्गज अभिनेते मेहमूद आजही त्यांच्या अनेक चित्रपटातील विनोदांसाठी लोकप्रिय आहेत. ‘पडोसन’, ‘प्यार किये जा’, ‘बॉम्बे टू गोवा’ या सिनेमांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरताना दिसत आहेत.
मेहमूद अशा काही कलाकारांपैकी एक होते, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या टॅलेंटवर विश्वास ठेवला. त्यांना प्रोजेक्ट मिळवून देण्यात मदत केली.
मेहमूद हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असायचे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते जास्त धार्मिक झाले होते. तरुण वयात ते रमजानचा महिन्यात रोजे ठेवायचे. पण, तुम्हाला माहीत आहे का, ते श्रावणदेखील पाळायचे. ते दिवसातून एकदा जेवायचे.
शुभा खोटे काय म्हणाल्या?
आता एका मराठी ज्येष्ठ अभिनेत्रीने त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. १९५०-६० च्या दशकात शुभा खोटे व मेहमूद यांनी काही चित्रपटांत एकत्र काम केले. आता त्यांनी दिलेल्या मुलाखतीत मेहमूद यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दल वक्तव्य केले. तसेच, धार्मिक उपवासाच्या वेळी ते एकमेकांना कसे साथ देत असत याचीसुद्धा आठवण सांगितली.
शुभा खोटे यांनी नुकतीच रेड एफएम पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “आम्ही सहा वर्षे एकत्र काम केले. आम्ही अनेक चित्रपटांत स्क्रीन शेअर केली. जेव्हा आम्ही एकत्र काम करीत होतो. त्यावेळी श्रावण महिन्यात उपवास करायचे. जेव्हा ते कठीण जाऊ लागलं, त्यावेळी मी सोमवारी आणि शनिवारी उपवास करू लागले. अशाच प्रकारे रमजानमध्ये मेहमूद शुक्रवारी रोजे ठेवायचे.”
“जेव्हा मी सोमवारी व शनिवारी उपवास करायचे तेव्हा मेहमूददेखील त्या दिवशी उपवास करायचे. जेव्हा ते शुक्रवारी रोजे ठेवायचे, तेव्हा मीदेखील त्यांच्याबरोबर त्या दिवशी रोजे ठेवायचे. आम्ही एकत्र इतकं काम केलं होतं की, आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकमेकांच्या रीतिरिवाजांचे पालन करू लागलो होतो.”
अमिताभ बच्चन आणि मेहमूद
मेहमूद यांचा धाकटा भाऊ अन्वर अली यांनीही अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अन्वर अली आणि अमिताभ बच्चन यांची खूप चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर ते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर राहू लागले होते.
अमिताभ बच्चन यांनी मेहमूद यांचा गॉडफादर, असाही उल्लेख केला आहे. जेव्हा अमिताभ बच्चन यांच्याकडे काहीही काम नव्हते, त्यावेळी त्यांनी बिग बींना बॉम्बे टू गोवा या चित्रपटात कास्ट केले. या चित्रपटातील कामामुळे सलीम-जावेद या जोडीने त्यांना जंजीर चित्रपटात कास्ट केले.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, मेहमूद यांनी मला कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यास मदत केली. त्यांनी माझ्या सुरुवातीच्या दिवसांत मला मदत केली. ते पहिले निर्माते होते, ज्यांनी मला ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये कास्ट केले. माझे अनेक चित्रपट फ्लॉप ठरत होते, तेव्हा मी पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी मला अन्वर अली यांनी थांबवले.