बॉलीवूडमधील सध्याच्या काही बड्या कलाकारांच्या यादीत येणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. रणबीर कपूरने त्याच्या अभिनयाने इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं आहे. रणबीरने २००७ मध्ये ‘सावरिया’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याला फारसं यश मिळालं नाही. पण या चित्रपटासाठी रणबीरला पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. याचदरम्यान, आणखी एका अभिनेत्यानेही बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा अभिनेता म्हणजे मुझम्मिल इब्राहिम.
मुझम्मिल इब्राहिमने पूजा भट्टच्या ‘धोखा’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. मुझम्मिलने नुकत्याच एका मुलाखतीत रणबीर कपूरच्या पदार्पणाच्या पुरस्काराबद्दल एक दावा केला आहे. तो दावा म्हणजे पदार्पणाच्या पुरस्कारासाठी रणबीरपेक्षा अभिनेता स्वत: त्या पुरस्कारासाठी पात्र होता. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मुझम्मिलने याबद्दल वक्तव्य केलं आहे.
यावेळी मुझम्मिल म्हणाला, “रणबीर कपूर आणि नील नितीन मुकेश यांनी एकाच वर्षी ‘सावरिया’ आणि ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटातून पदार्पण केलं. तेव्हाच मीसुद्धा पूजा भट्टच्या ‘धोका’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. तेव्हा रणबीर कपूर आणि नील नितीन मुकेश यांना पदार्पणाच्या पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं होतं. मलासुद्धा ते नामांकन होतं. पण मला या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं गेलं नव्हतं.”
यापुढे त्याने सांगितलं, “जेव्हा मी नाना पाटेकरांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनीही मला सांगितले की, आम्हाला माहित होतं तुला हा पुरस्कार मिळणार नाही. तेव्हा ते म्हणालेले, ‘तू चांगला अभिनय केलास; पण आम्हाला माहित होतं ते रणबीर कपूरला हा पुरस्कार देणार आहेत’. यापुढे मुझम्मिलने सांगितलं शाहरुख खानदेखील म्हणालेले की, मला वाटतं पदार्पणाच्या पुरस्कारासाठी मुझम्मिल जास्त पात्र अभिनेता आहे.”
यापुढे मुझम्मिल म्हणाला, “‘धोखा’ या चित्रपटामधील पदार्पणाच्या पुरस्कारासाठी मी जास्त पात्र आहे. पदार्पणाचा पुरस्कार मला मिळायला हवा होता. कारण मला वाटतं की, मी ‘सावरिया’मधील रणबीरपेक्षा चांगला अभिनय केला होता.” दरम्यान, याच मुलाखतीत मुझम्मिलने पुढे “मला आता रणबीर आवडतो. तो एक उत्तम अभिनेता आहे. मी ज्या स्टार किड्सचा आदर करतो त्यापैकी रणबीर एकमेव आहे.”
दरम्यान, मुझम्मिलबद्दल सांगायचं झालं तर, तो ‘धोखा’, ‘विल यू मॅरी मी?’ ‘हॉर्न ओके प्लीज,’ ‘धीमे धीमे’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने मॉडेलिंगही केलं आहे. २००३ मध्ये मुझम्मिलने ‘ग्लॅड्रॅग्स मॅनहंट इंडिया’ स्पर्धा जिंकली आणि त्याला ‘मिस्टर इंडिया’ असे नाव देण्यात आले. ‘स्पेशल ऑप्स’ या वेबसीरिजमध्येही त्याने महत्त्वाची भूमिका केली होती.