अभिनेता, मॉडेल मुझम्मिल इब्राहिम सध्या चर्चेत आला आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे, त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याबद्दल बोललं जात आहे. त्याने नुकतंच प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणबद्दल वक्तव्य केलं होतं. दीपिका त्याच्याबरोबर दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होती व त्यानेच तिच्यासह ब्रेकअप केलं असं म्हटलं होतं.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुझम्मिल याबद्दल बोलला होता. यासह त्याने अभिनेत्रीबद्दल अजून एक वक्तव्य केलं होतं. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात दीपिका पदुकोण व रणबीर कपूर हे दोघे झळकले होते. या चित्रपटाबद्दल बोलताना तो म्हणाला, “किरण रावला माझं ‘धोका’ चित्रपटातील काम खूप आवडलं होतं आणि तिनेच माझी अयान मुखर्जीशी ओळख करून दिली, जो त्यावेळी ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाच्या कामात व्यग्र होता. अयानला मी खूप आवडायचो. तो मला म्हणाला, ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट तेव्हा तो मला डोक्यात ठेवून लिहित आहे.”
मुझम्मिलने या मुलाखतीमध्ये त्याने दीपिका व तो दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं, त्यामुळे त्याला “दीपिकाचा याच्याशी काही संबंध होता का?” असं विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, “नाही, दीपिकाचा या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. तर मीच या चित्रपटासाठी तिचं नाव सुचवलं होतं. अयान मला कलाकारांच्या कास्टिंगबद्दल विचारत असे. दीपिका पदुकोण की कतरिना कैफ कोण योग्य ठरेल याबाबत चर्चा होत असायची. आम्ही तेव्हा खूप जवळचे मित्र होतो. दीपिका चित्रपटासाठी योग्य निवड होती, त्यामुळे मी तिचं नाव सुचवलं.”
मुझम्मिल पुढे म्हणाला, “पुढे गोष्टी बदलत गेल्या आणि कलाकारांची निवड करण्याचा निर्णय कास्टिंग एजेंटकडे गेला. त्यावेळी अयान व माझ्यामध्ये गैरसमजही झाले होते, म्हणूनच त्याने आजवर मला कुठल्याही कामासाठी विचारलं नाही.” मुझम्मिल पुढे म्हणाला, “अयान मला चित्रपटात काम देणार असं म्हणाला होता, पण ते कधी घडलंच नाही. तो असंही म्हणाला होता की तो मला चित्रपटाची संहिता वाचण्यासाठी देईल.” कास्टिंग एजेंटमध्ये आल्याने अयान व त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण झाल्याचं त्याने पुढे म्हटलं आहे. “अयान नंतर मला म्हणत होता की त्याला माझ्याबरोबर हा चित्रपट करायचा होता, पण कास्टिंग एजेंटमुळे सर्वच गोष्टी बिघडल्या. त्यांचं ध्येय वेगळं असतं आणि संवाद साधण्याची पद्धतही वेगळी असते. त्यांनी त्यांच्या आवडीच्या लोकांना संधी दिली”, असंही मुझम्मिलने म्हटलं आहे.
अयान मुखर्जीबद्दल बोलताना मुझम्मिल म्हणाला, “मी अयानला चित्रपटातील कामासाठी कधीच स्वत: विचारलं नाही, कारण मला ते योग्य वाटलं नाही आणि रणबीर कपूर त्याचा जवळचा मित्र होता म्हणून कदाचित ‘ये जवानी है दिवानी’मध्ये त्याची निवड केली असावी.” याच मुलाखतीमध्ये मुझम्मिल असंही म्हणाला होता की, “रणबीर कपूरच्या पदार्पणातील चित्रपट ‘सावरिया’तील कामापेक्षा ‘धोका’मधील माझं काम चांगलं होतं.” हे दोन्ही चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाले होते.