Ratna Pathak Talk’s About Husband Naseeruddin Shah : ग्लॅमर, सौंदर्य या गोष्टी अभिनयक्षेत्रात नाही म्हटलं तरी महत्त्वाच्या ठरतात. बऱ्याचदा यानुसार कलाकारांना कामं मिळतात. अशातच आता अभिनेत्री रत्ना पाठक यांनीसुद्धा खासगी आयुष्यातील अनुभव सांगत यावर वक्तव्य केलं आहे.
रत्ना पाठक नेहमीच ठामपणे त्यांची मतं मांडत असतात. अशातच त्यांनी एका मुलाखतीमध्ये बॉलीवूडमध्ये सुंदरता, ग्लॅमर याला कसं महत्त्व आहे याबाबत सांगितलं आहे. त्यांनी नुकतीच ‘बीबीसी’ला मुलाखत दिली. यामध्येच त्यांनी त्यांचा अनुभवसुद्धा सांगितला आहे. रत्ना पाठक यांनी या मुलाखतीमध्ये त्यांच्या केसांना रंगवण्याबद्दल सांगितलं आहे. यासाठी त्यांना त्यांचे पती नसीरुद्दीन शाह यांनी सल्लासुद्धा दिला होता.
मुलाखतीमध्ये रत्ना यांनी त्यांच्या पांढऱ्या केसांबद्दल तसेच हेअर स्टाईबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, “मी केसांच्या हेअर स्टाईलबद्दल काही नियोजन केलं नव्हतं. मला पांढरे केस हवे होते. मी याबाबत खूप विचार केला होता. मी खोटं बोलणार नाही, पण काहीवेळा मला यामुळे त्रास व्हायचा, पण ही चांगली गोष्ट होती.”
नसीरुद्दीन शाह यांनी दिलेला ‘हा’ सल्ला
रत्ना पाठक पुढे म्हणाल्या, “केसांना असलेला नैसर्गिक रंग न बदलता तो तसाच ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी नसीरुद्दीन शाह यांनी मला सल्ला दिला होता. ते म्हणाले, केसांना रंग देणं थांबव. त्यामुळे खरंच मला बरं वाटलं. असं करणं अवघड होतं. कामं मिळणं कमी झालेलं, कारण माझ्याबरोबर काम करणारे पुरुष कलाकार केस रंगवायचे. अजूनही ते केस रंगवतात.”
अभिनेत्री पुढे हसत म्हणाल्या, “मी स्वत:ला आजी वगैरेंसारखं समजायला लागले होते. इंडस्ट्रीमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींना कधी कधी चांगली कामं मिळत नाही, त्यामुळे आजीसारखं दिसत असाल तर काय अपेक्षा ठेवणार. पण, असं असतानाही सुदैवानं मला चांगल्या भूमिका मिळाल्या, त्यामुळे मला मी जशी आहे त्याचा स्वीकार केल्याचा आनंद आहे आणि कलाकारासाठी ते महत्त्वाचं आहे असं वाटतं.”
रत्ना पाठक यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी ‘जाने तू या जाने ना’, ‘कपूर अँड सन्स’, ‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’, ‘थप्पड’, यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.