Nupur Shikare Talks About Father In Law Aamir Khan : आमिर खानची लेक आयरा खान व जावई नुपूर शिखरे हे दोघे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रील शेअर करत असतात. दोघांनी जानेवारी २०२४ मध्ये लग्न केलं होतं. अशातच आता नुपूरने त्यांच्या लग्नाबद्दल, आयरा व सासरे आमिर खानबद्दल सांगितलं आहे.

आयरा खान व नुपूर शिखरे यांचं लग्न झालं त्यावेळी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते. दोघांनी उदयपूरमध्ये लग्न केलं होतं, परंतु त्यापूर्वी त्यांनी मुंबईत नोंदणीकृत पद्धतीने लग्न केलेलं. त्यावेळी नुपूर शिखरे चक्क जीमच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळालेला. त्यावेळी याबद्दल खूप चर्चा झालेली. अशातच आता नुपूरने तेव्हा नेमकं काय घडलेलं, तसेच त्यांच्या नात्याबद्दल पहिल्यांदा आमिर खानला कळलं तेव्हा त्याची व खान कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती याबद्दल सांगितलं आहे.

नुपूरने ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. त्याने या मुलाखतीत सांगितलं की, २००७ पासून तो फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत असून २०१३ दरम्यान त्याला आमिर खानला ट्रेन करण्याची संधी मिळालेली. तेव्हा सहा महिने त्याने त्याला ट्रेन केलं. त्यानंतर पुढे २०१५ मध्ये त्याला आमिर खानच्या ऑफिसमधून फोन आला आणि सांगण्यात आलं की, ते त्यांच्या मुलीसाठी ट्रेनर शोधत आहेत, तेव्हा पहिल्यांदा नुपूर व आयराची भेट झालेली.

२०१५ मध्ये त्यांची भेट झाल्यानंतर पुढे बराच काळ त्याने तिला ट्रेनिंग दिली. पुढे २०१९-२०२० दरम्यान त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली आणि पुढे ते डेट करायला लागले. मुलाखतीत पुढे “तुझे सासरे आमिर खानची काय प्रतिक्रिया होती” असं विचारल्यानंतर तो गमतीत म्हणाला की, “त्यांनीच निवड केलेली, पण त्यांनी विचारलेलं की तुमचं कसं, कधी सुरू झालं. तेव्हा मी गमतीत त्यांना म्हणालो, तुम्हीच तर निवड केली.” खान कुटुंबीयांबद्दल तो म्हणाला, “त्यांच्या घरच्यांना काहीही हरकत नव्हती, माझं त्यांच्या कुटुंबाबरोबर खूप चांगलं नातं आहे. आयराच्या आईबरोबर तर माझं खूप जमतं. माझी आईसुद्धा त्यांच्याबरोबर खूप चांगली मिसळली आहे.”

आमिर खानने जावयाला विचारलेले ‘हे’ प्रश्न

नुपूरने पुढे सांगितलं की, “आमिर खानने फक्त काय करतो, पुढे काय करणार आहे? तुमचं कसं जुळलं याबद्दलच विचारलेलं. त्यांना किंवा खान कुटुंबीयांना कुठलीही समस्या नव्हती. माझ्या आई-वडिलांनी जसं विचारलं असतं तसंच त्यांनी विचारलेलं.”

नुपूरला पुढे त्यांच्या लग्नादरम्यान नेमकं काय घडलेलं याबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “मला वरात वगैरेची फार आवड नाहीये. जेव्हा आमच्या लग्नाची बोलणी सुरू होती, तेव्हा मला विचारल्यानंतर मी सांगितलेलं की मला तरी फार याबद्दल काहीच उत्सुकता नाही आणि तेव्हा आमचं फक्त रजिस्टर लग्न होतं. आमचं मेन लग्न उदयपूरला झालं. ३ जानेवारी ही तारीख आम्ही ठरवली होती, कारण तेव्हाच आम्ही डेट करायला सुरू केलेलं. लग्नातही आम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या केल्या, जी माणसं आवडतात त्यांना बोलावलेलं आणि आम्ही सगळ्यांनी पार्टी केली.”

नुपूर पुढे म्हणाला, “रजिस्टर करणार होतो तेव्हा मी सांगितलेलं की मी धावत येईन, मला वरात वगैरे काही नकोय, कारण लॉकडाउन असताना मी तिला धावत धावत भेटायला जायचो. तेव्हा तिनेसुद्धा त्या रस्त्यावर माझ्यासाठी छान सरप्राइज ठेवले होते. पण, तिथे गेल्यानंतर मी कपडे वगैरे बदलून फ्रेश होऊन जाणार होतो, मात्र तसं काहीही झालं नाही. कारण तिथे खूप मीडिया होती आणि लग्नाच्या आधी जे कार्यक्रम झाले तेव्हा मीडियातील लोकांना माझ्या घरचा पत्ता माहीत झाला होता आणि त्यामुळे त्या दिवशी ते घरापासून पुढे माझा पाठलाग करत आले.”