अभिनेता प्रतीक स्मिता पाटील यांचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं राहिलंय. त्याच्या जन्मानंतर काही दिवसांनी आई स्मिता पाटीलचं निधन झालं. त्याचे वडील राज बब्बर पहिली बायको नादिराजवळ परत गेले. त्यानंतर प्रतीकला त्याच्या आजी-आजोबांनी (स्मिता पाटील यांचे आई-वडील) मोठं केलं. वडील असूनही प्रतीक मात्र दोन्ही पालक नसल्याप्रमाणेच मोठा झाला. याचा परिणाम त्याच्या स्वभावावर झाला.
झूमला दिलेल्या मुलाखतीत प्रतीकने सांगितलं की घरातील परिस्थितीमुळे तो कसा व्यसनाधीन झाला. “मी दोन वेळा ड्रग्जचा ओव्हरडोस केला, रिहॅबला गेलो, पण त्याचा फायदा होत नव्हता. दुसऱ्यांदा रिहॅबमधून बाहेर आल्यावर काही आठवड्यांतच, मी पुन्हा व्यसनाधीन झालो. माझ्या कुटुंबाच्या परिस्थितीची आणि माझ्याबरोबर आई-वडील नसल्याची मला लाज वाटत होती. मी या सर्व गोष्टींमधून गेलो. मी ड्रग्ज घेत होतो पण मी सुरक्षित होतो,” असं प्रतीक म्हणाला.
व्यसनाच्या परिणामांबद्दल प्रतीक म्हणाला, “ते खूप कठीण दिवस होते. तुमच्यावर बहिष्कार टाकला जातो. मी खूप नशीबवान होतो की माझे कुटुंब माझ्याबरोबर होते. ते माझ्यावर खूप नाराज होते, पण ते तिथे होते. समाजात मला खूप वेगळ्या पद्धतीने पाहिले जात असे आणि अनेकांनी त्यांच्या मुलांना माझ्यापासून दूर राहण्यास सांगितलं होतं.”
प्रतीकने फोडलेला टीव्ही
बालपणी खूप रागीट असल्याची कबुली प्रतीकने दिली. आई-वडील नसल्याने होणाऱ्या त्रासाबद्दल प्रतीकने सांगितलं. “मी नैराश्य खूप नंतर अनुभवले; माझ्या बालपणी मला खूप राग यायचा. मी नेहमीच रागावायचो आणि मी नेहमी रागात असायचो. मला आठवते की मी टीव्ही पाहत होतो आणि माझ्या आईचा एक चित्रपट चालू होता. ती माझ्याबरोबर नव्हती याचा मला राग आला आणि मी टीव्ही उचलला आणि तो फोडला. मी बेसबॉल बॅटने घरातील सर्व फोटो फोडले होते,” असं प्रतीक म्हणाला.
आयुष्यात आलेले बरे-वाईट अनुभव व चढ-उतारांनंतर प्रतीक बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. तो शेवटचा सलमान खान, रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल आणि शर्मन जोशी यांच्यासह ‘सिकंदर’मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करू शकला नाही, पण प्रतीकसाठी मात्र आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.