Singer on why he started wearing his Mother’s Mangalsutra: मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या खासगी गोष्टींमुळेदेखील चर्चेत असतात. या कलाकारांच्या अनेक गोष्टींबाबत चाहत्यांना उत्सुकता असते. गायक पलाश सेन हा गळ्यात मंगळसूत्र का घालतो, हे तुम्हाला माहित आहे का?
गायक पलाश सेनने आजपर्यंत त्याच्या कारकिर्दीत गायलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. ‘मायरी’, ‘महाकाल चलो’,’अलविदा’, ‘मेहफुज’, ‘हम’, ‘मैं कौन हूँ’, ‘आना मेरी गली’, ‘अब ना जा’, ‘धूम पिचक’ अशी अनेक गाणी त्याने गायली आहेत.
पलाश सेन गळ्यात त्याच्या आईचे मंगळसूत्र का घालतो?
पलाश सेन त्याच्या गळ्यात त्याच्या आईचे मंगळसूत्र घालतो. तो असे का करतो? याचे कारण काय? याबद्दल त्याने एका मुलाखतीत खुलासा केला होता. ‘माशाबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत गायक त्याच्या आईबद्दल म्हणजेच डॉ. पुष्पा सेन यांच्याबद्दल म्हणालेला, “जेव्हा माझी आई आठ वर्षांची होती, त्यावेळी भारताची फाळणी झाली होती. ती तिच्या दोन वर्षांच्या लहान भावाला घेऊन लाहोरमधून जम्मूमध्ये आली होती.”
“त्या दोघांबरोबर इतर कोणीही मोठी व्यक्ती नव्हती. ती खूप खंबीर आहे. ती मुलांच्या शाळेत जात असे. कारण- त्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये मुलींसाठी शाळा नव्हती. ती १७ वर्षांची असताना तिने घर सोडले आणि तिने लखनऊमध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला.”
गायक पुढे म्हणालेला, “तुम्ही जितके खंबीर असता, तेव्हा तुमचे निर्णयही तितकेच कठीण असतात. त्यामुळे माझ्यामध्ये आणि माझ्या आईमध्ये खूप मतभेद व्हायचे. तसेच, आमच्यामध्ये खूप भांडणेदेखील व्हायची.”
“माझी आई माझ्या आयुष्यातील खूप महत्वाची व्यक्ती आहे. तिच्याकडे एक मंगळसूत्र होते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर तिने ते मंगळसूत्र घालणे बंद केले होते. ते मी घालणे सुरू केले. प्रामुख्याने जेव्हा मी परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर जातो, तेव्हा ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात असते. मंगळसूत्र घालण्याचे कारण म्हणजे त्या मंगळसूत्रामुळे मला असे वाटते की, तिचे आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहेत.”
पलाशने १९९८ मध्ये युफोरिया (Euphoria) या त्याच्या बँडची स्थापना केली. त्याची गाणी लोकप्रिय ठरली, त्याच्या अनेक गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. दरम्यान, २००१ मध्ये ‘फिलहाल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात तब्बू आणि सुश्मिता सेन या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसल्या.