गायक पलाश सेन त्याच्या गाण्यांसह त्याच्या स्टाईलमुळे चर्चेत असतो. पलाश गळ्यात आईचं मंगळसूत्र घालतो. अनेकदा मोठ्या कार्यक्रमांमध्येही तो मंगळसूत्र घालून जातो. यामागचं कारण नेमकं काय आहे, याबदद्लचा खुलासा खुद्द पलाशने केला आहे. याशिवाय त्याने त्याच्या आईचा संघर्ष, त्याचं आईशी असलेलं नातं, त्याचं संगीत या सर्व विषयांवर खुलेपणाने एका मुलाखतीत भाष्य केलंय. स्वतः डॉक्टर असलेल्या पलाशचा जन्म डॉक्टर पालकांच्या पोटी झाला होता.
‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत पलाशने आपल्या आईच्या संघर्ष व हिमतीबद्दल खुलासा करताना जुना किस्सा सांगितलं. तो म्हणाला, “फाळणी झाली तेव्हा माझी आई आठ वर्षांची होती. चार वर्षांच्या भावाची काळजी घेत आठ वर्षांची ती एकटीच लाहोर ते जम्मूपर्यंत चालत आली होती. ते दोघे सीमेपलीकडून जम्मूला एकटेच चालत आले. ती खूप खंबीर होती. ती फक्त मुलं शिकत असलेल्या शाळेत गेली होती, कारण त्या वेळी जम्मू-काश्मीरमध्ये मुलींची शाळा नव्हती. ती अवघ्या 17 वर्षांची असताना तिने लखनौमध्ये एमबीबीएस करण्यासाठी तिचं घर सोडलं होतं,” अशी माहिती पलाशने दिली.
तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही इतक्या मजबूत आणि हिंमत असलेल्या पालकांच्या पोटी जन्मता तेव्हा, तुम्ही तसेच मजबूत होता. तुम्ही एक कठोर व्यक्ती बनता. मला वाटतं की त्यामुळेच आई आणि माझ्यामध्ये बरेच मतभेद आणि भांडणं झाली. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. तिच्याकडे एक मंगळसूत्र होतं, माझे वडील गेल्यावर तिने ते घालणं बंद केलं. मग मी ते मंगळसूत्र घालायला सुरुवात केली. मी ते प्रामुख्याने स्टेजवर घालतो, त्या माध्यमातून तिचा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमीच असतो. मी खरतौश देखील घालतो. ते मी इजिप्तमधून घेतलं होतं. त्यामध्ये, माझ्या पालकांची नावं इजिप्शियन चित्रलिपीत दोन्ही बाजूला लिहिलेली आहेत,” असं पलाशने सांगितलं. पालकांचे आशीर्वाद आपल्याबरोबर कायम आहेत, याची जाणीव ते मंगळसूत्र घातल्याने होते, त्यामुळे आपण ते घालतो, असं पलाश म्हणाला.
Bigg Boss 16: कोण आहे एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड बुबा? जाणून घ्या तिचं खरं नाव
दरम्यान, पलाशने 1998 मध्ये दिल्लीमध्ये युफोरिया नावाच्या म्युझिक ग्रूपची स्थापना केली होती. हा बँड ‘मेरी’, ‘धूम पिचक धूम’, ‘आना मेरी गली’, ‘अब ना जा’, ‘सोणेया’, ‘मेहफुज’ आणि ‘सोने दे मा’ यासारख्या हिट गाण्यांसाठी ओळखला जातो. पलाशने 2001 मध्ये ‘फिलहाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.