Param Sundari advance booking: गेल्या काही महिन्यात बरेच रोमँटिक चित्रपट प्रदर्शित झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. इतकेच काय तर प्रेक्षक हा चित्रपट पाहताना ढसाढसा रडले होते. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सैयारा चित्रपटात अनित पड्डा आणि अभिनेता अहान पांडे प्रमुख भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातून या दोन्ही कलाकारांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
सैयारा चित्रपटानंतर ‘धडक २’ हा चित्रपटही मोठ्या प्रमाणात गाजला. सिद्धांत चतुर्वेदी व तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही, मात्र चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये किती तिकीटांची विक्री?
आता दोन चित्रपटानंतर आणखी एक रोमँटिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव परम सुंदरी असे आहे. जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा शुक्रवारी म्हणजे २९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
मॅडॉक फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या निर्मिती कंपनीने गेल्या काही वर्षांत अनेक लोकप्रिय रोमँटिक चित्रपटांची निर्मिती केली. यामध्ये ‘लव्ह आज कल’, ‘कॉकटेल’, ‘लुका छुपी’, ‘जरा हटके जरा बचके’ आणि ‘भूल चुक माफ’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘स्त्री २’ आणि २०२५ च्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला ‘छावा’ या दोन्ही गाजलेल्या सिनेमांची निर्मिती याच संस्थेने केली आहे.
आता परम सुंदरी या चित्रपटाचे मंगळवारपासून म्हणजेच २६ ऑगस्टपासून अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. २४ तासांत या चित्रपटाची १०हजार तिकिटे विकली गेली. हा चित्रपट पहिल्या दिवशी १० कोटींची कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सैयाराने पहिल्याच दिवशी २१.५० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे परम सुंदरी सैयाराला मागे टाकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, वामिका गब्बी व राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला भूल चूक माफ या चित्रपटापेक्षा परम सुंदरी जास्त कमाई करेल. कारण- या चित्रपटाने मे महिन्यात पहिल्या दिवशी ७ कोटी रुपये कमावले होते. तसेच, सिद्धार्थच्या २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘योद्धा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.१० कोटी रुपये कमावले होते.
परम सुंदरी या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा त्यांचा पहिलाच चित्रपट असणार आहे. त्यांनी ‘दसवी’ या चित्रपटाचेदेखील दिग्दर्शन केले होते. २०२२ मध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.
परम सुंदरी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, त्यामुळे स्पर्धा असणार नाही. मात्र, ५ सप्टेंबर रोजी विवेक अग्निहोत्री यांचा ‘द बंगाल फाइल्स’ आणि अहमद खान यांचा ‘बागी ४’ प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.