Paresh Raval Talks About Hera Pheri 3 : परेश रावल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी एक म्हणजे बाबू भैया ही भूमिका. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘हेरा फेरी ३’ चित्रपटातून एक्झिट घेतलेली, ज्यामुळे अनेक चर्चा सुरू होत्या. अशातच आता त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’नंतर आता ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुरुवातीला परेश यांनी बाबू भैया ही भूमिका साकारण्यास नकार दिलेला. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबरोबर वैचारिक वाद झाल्याचं म्हटलं गेलं. तसेच अक्षय कुमारनेही तो या चित्रपटाचा निर्माताही असल्याने अशी अचानक एक्झिट घेतल्याने नुकसान होणार होतं, म्हणून त्यांना नोटीसही पाठवलेली.
हेरा फेरी ३बद्दल परेश रावल यांची प्रतिक्रिया
‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत परेश यांनी आता ‘हेरा फेरी ३’चं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचं सांगत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “काम सुरू आहे. आम्ही पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत. खूप काही घडलं, पण त्यामुळे प्रियदर्शन (दिग्दर्शन) व माझ्या नात्यात काही बदल झाला नाही. अशी नाती तुटत नाही. उलट जे झालं त्यामुळे आमचं नातं अधिक घट्ट झालं. आम्ही एकमेकांना खूप जवळून ओळखतो. आता जखमा भरल्या आहेत.”
परेश रावल पुढे म्हणाले, “प्रियदर्शनने व मी अजून बाबूराव या भूमिकेबद्दल फार चर्चा केली नाहीये. एका चित्रपटासाठी अनेक जण मेहनत घेत असतात. मला वाटत नाही श्याम आणि राजू नसतील तर बाबूरावला तितकं महत्त्व असेल. मी हावरट किंवा मूर्ख अभिनेता नाहीये, माझ्यामुळे जग चालतं असा विचार करणाऱ्यांमधील मी नाही.”
परेश यांनी पूर्वी याच माध्यमाशी संवाद साधताना सांगितलेलं की, “‘फिर हेरा फेरी’ चित्रपट मला फार आवडला नव्हता, त्यात फक्त सुनील शेट्टीचं श्याम हे पात्र जसंच्या तसं दाखवण्यात आलेलं. जेव्हा ते ‘फिर हेरा फेरी’ बनवत होते तेव्हा त्यांच्यामध्ये अति आत्मविश्वास निर्माण झाला होता. पण, तसं व्हायला नव्हतं पाहिजे. ‘हेरा फेरी’मध्ये जशी पात्र आहे, तशी फार कमी वेळेला आमच्या वाट्याला येतात; त्यामुळे अशावेळी खूप बारकाईने, चांगलं काम करावं लागतं. जेव्हा मी ‘फिर हेरा फेरी’साठी डबिंग करत होतो, तेव्हाच मला जाणवलेलं की, आम्ही वाईट चित्रपट बनवला आहे.”