Paresh Rawal On The Taj Story Controversy : परेश रावल यांचा आगामी चित्रपट ‘द ताज स्टोरी’ एका वादात अडकला आहे. चित्रपटात ऐतिहासिक बाबींची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप वकील शकील अब्बास यांनी केला आहे. तसंच अयोध्याच्या भाजपा नेत्याने चित्रपटाला विरोध केला असून यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

२०२२ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आधारित असलेल्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी भाजपा नेते आणि प्रवक्ते रजनीश सिंह यांनी केली आहे. परंतु, बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. अशातच या वादावर आता परेश रावल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

NDTV दिलेल्या मुलाखतीत अभिनेते परेश रावल आणि झाकीर हुसेन यांनी या चित्रपटाच्या वादावर आणि त्या चित्रपटामुळे तणाव निर्माण होण्याच्या आरोपांवर आपलं मत व्यक्त केलं.

परेश रावल म्हणाले, “तुषार (चित्रपटाचे दिग्दर्शक) यांनी योग्य संशोधन केलं आहे. यामध्ये काहीही चुकीचं नाही. त्यांचे स्रोत स्पष्टपणे नमूद केले होते आणि मीही माझ्या काही मित्रांशी याबाबत विचारणा केली आहे, ज्यांनी तथ्य तपासली आहेत. आम्ही सुरुवातीपासूनच हे ठरवलेलं की, या चित्रपटात हिंदू-मुस्लीम वाद असू नये. चित्रपटात एक संवाद आहे, जिथे एक पात्र म्हणतं, ‘भाऊ, हे तुम्ही पत्रकारच हिंदू आणि मुस्लीम यांच्यात भेद करता. इथे हिंदू-मुस्लीम संघर्ष नाही. हा एक इतिहास आहे.”

पुढे परेश रावल यांनी आणखी सीन विस्तृत करत म्हटलं, “चित्रपटात एक जण म्हणतो, ‘याचं काय करायचं?’ त्यावर दुसरे पात्र उत्तर देतो, ‘तोडून टाका.’ यावर तो आधीचा त्याला उत्तर देत म्हणतो, ‘नाही.. आम्ही हे तोडणार नाही, प्रत्येक समस्या तोडून किंवा नष्ट करून सोडवता येत नाही; कधी कधी स्वीकारणंही मोठी गोष्ट आहे.”

यानंतर झाकीर हुसेन यांनी या चित्रपटाचा इतिहासाशी असलेला संबंध स्पष्ट केला. त्यांनी सांगितले, “स्वीकारणं हे केवळ ऐतिहासिक सत्यावर आधारित आहे, जे शाहजहानने स्वतः लिहिले होते. आम्ही असं म्हणत नाही की त्याने काही वाईट बनवले; त्याने काही उत्तम निर्माण केलं आहे, पण ते लपवण्याची काय गरज होती?”

‘द ताज स्टोरी’ विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देताना परेश रावल यांनी स्पष्ट केले, “ही याचिका चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यासाठी नव्हे तर न्यायालयाने चित्रपट पाहण्यासाठीच्या विनंतीसाठी केली होती. पण, चित्रपटाला आधीच CBFC प्रमाणपत्र मिळालं आहे. न्यायालयदेखील हे सर्व समजून आहे, ते मूर्ख नाहीत. हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा आमचा कधीच उद्देश नव्हता. जातीय तणाव निर्माण करण्यासाठी कोण इतके पैसे गुंतवेल?”

दरम्यान, ‘द ताज स्टोरी’चे लेखन आणि दिग्दर्शन तुषार अमरीश गोयल यांनी केलं आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. यात परेश रावल यांच्यासह झाकीर हुसेन, अमृता खानविलकर, नमित दास आणि स्नेहा वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.