परेश रावल हे बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परेश यांनी ‘दे दना दन’, ‘भुल भूलैया’, ‘रोड टू संगम’, ‘महारथी’, वेलकम’, गोलमाल, ‘चुपचाप’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, ते खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आले ते ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांमुळे. त्यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी व परेश रावल हे त्रिकूट पाहायला मिळालं होतं. या चित्रपटातील तिघांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि आजही या चित्रपटाची व या त्रिकुटाची क्रेझ कायम आहे.

अशातच परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार व त्यांच्यातील मैत्रीबद्दल वक्तव्य केलं होतं. ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना ‘अक्षय कुमार तुमचा मित्र आहे का’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटलं, “हो, पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये सहकलाकार असतात, नाटकात मित्र असतात आणि शाळेत जीवलग मित्र असतात. इंडस्ट्रीमधील कलाकारांपैकी ओम पुरी, नसीरुद्दीन शाह व जॉनी लीवर या तिघांना मी मित्र मानतो.”

पुढे अक्षय कुमारबद्दल ते म्हणाले, “अक्षय कुमार हा खूप मोठा अभिनेता आहे, देखणा आहे, माणूस म्हणून खरा आहे आणि तो अशी व्यक्ती आहे, ज्याच्याबरोबर आपल्याला मैत्री करावीशी वाटते.” परंतु, परेश रावल यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अक्षय कुमार व त्यांच्यातील मैत्रीला घेऊन चर्चा रंगली होती. त्यामुळे आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, “मी फक्त म्हणालो होतो, तो माझा सहकलाकार आहे. माझ्यासाठी मैत्री म्हणजे ज्यांच्याशी माझं महिन्यातून निदान ४-५ वेळा बोलणं होतं. मी फक्त तो सहकलाकार आहे, असं म्हटलं आणि त्यानंतर लोकांनी मला काय झालं? तुमच्यामध्ये सगळं नीट आहे ना, असं विचारलं. काही झालेलं नाहीये.” पुढे त्यांना ‘जेव्हा अक्षय कुमारने तुमची मुलाखत पाहिली का’, असं विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी, “नाही. तो खूप शांत माणूस आहे.आम्ही दोघांनी जवळपास १५-२० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो एक उत्कृष्ट व्यक्ती आहे”, असं म्हटलं आहे.