Paresh Rawal returns to Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी 3’ चित्रपटाबद्दलचा वाद काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चे होता होता. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ‘हेरा फेरी 3’ चित्रपटातून काढता पाय घेतला होता. पण आता त्यांनीच या चित्रपटात काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. सगळे वाद मिटले आहेत, असं म्हणत त्यांनी या चित्रपटाचा भाग असण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. म्हणजेच आता परेश रावल बाबूराव गणपतराव आपटे हे पात्र साकारताना दिसणार आहेत.
हिमांशू मेहताच्या एका पॉडकास्टमध्ये, परेश यांना ‘हेरा फेरी ३’ च्या वादाबद्दल विचारण्यात आलं. उत्तर देत परेश म्हणाले, “कोणताही वाद नाहीये. माझा असं वाटतं की जेव्हा लोकांना एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. ही प्रेक्षकांप्रती आपली जबाबदारी आहे. प्रेक्षकांनी तुम्हाला खूप प्रेम दिलंय, त्यामुळे तुम्ही गोष्टी गृहीत धरू शकत नाही. परिश्रम घेऊन त्यांच्यासाठी चांगला चित्रपट तयार करा.”
सर्वांनी एकत्र येऊन चित्रपटासाठी काम करायला हवं, असं मत असल्यासं परेश यांनी नमूद केलं. “त्यामुळे माझं मत असं होतं की सर्वजण एकत्र येऊ, मेहनत करू. बाकी काही नाही. आता सगळ्या समस्या सुटल्या आहेत,” असं परेश रावल म्हणाले.
‘हेरा फेरी 3’चं काम मूळ कलाकारांबरोबर सुरू आहे का? असं विचारल्यावर परेश रावल हसत म्हणाले, “चित्रपट आधीही येणारच होता, पण आता आम्हाला स्वतःला फाइन-ट्यून करावे लागले. कारण शेवटी सर्वजण क्रिएटिव्ह आहेत, मग ते प्रियदर्शन असोत, अक्षय असो किंवा सुनील असो. ते सर्वजण मागील बऱ्याच वर्षांपासून मित्र आहेत.” स्क्रीनने ‘हेरा फेरी 3’ मध्ये काम करण्याबाबत परेश रावल यांना विचारलं असता त्यांनी होकार दिला.
हेरा फेरी 3 वाद
परेश रावल यांनी अचानक ‘हेरा फेरी 3’ मधून एक्झिट घेतली होती. क्रिएटिव्ह मतभेदांमुळे त्यांनी चित्रपट सोडला होता, अशा बातम्या आधी आल्या. नंतर १८ मे रोजी परेश यांनी एक्सवर अधिकृतपणे पोस्ट केली की ते आता या चित्रपटाचा भाग नाहीत. “मी हे ऑन रेकॉर्ड सांगतोय की ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेर पडण्याचा माझा निर्णय क्रिएटिव्ह मतभेदांमुळे नव्हता. मी पुन्हा सांगतो की चित्रपट निर्मात्यांशी कोणतेही मतभेद नाहीत. मला प्रियदर्शन यांच्याप्रती प्रेम, आदर आणि विश्वास आहे,” असं त्यांनी लिहिलं होतं.
हेरा फेरी 3 चा निर्माता अक्षय कुमारही आहे. परेश रावल यांच्या एक्झिटनंतर २५ कोटी रुपयांची नोटीस पोठवली होती. त्यांना ११ लाखांचं मानधन आधीच दिल्याचंही सांगण्यात आलं होतं. त्यानंतर परेश रावल यांच्या लीगल टीमने ११ लाख रुपये व १५ टक्के व्याज अशी सगळी रक्कम परत केल्याचं सांगितलं. अखेर सगळे वाद सोडवल्यानंतर परेश रावल हेरा फेरी 3 मध्ये दिसणार आहेत.