Paresh Rawal on Nana Patekar: परेश रावल हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या स्पष्टवक्तपणासाठीदेखील ओळखले जातात. ते अनेकदा मुलाखतींमध्ये विविध किस्से, अनुभव सांगतात. त्यांनी ज्यांच्याबरोबर काम केले, त्यांच्याबद्दलदेखील ते किस्से सांगतात.

परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वीच ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नाना पाटेकरांचा किस्सा सांगितला.

“नाना पाटेकरांनी तितके….”

परेश रावल म्हणाले, “एक निर्माता आहे. त्याचं नाव मी सांगणार नाही. त्याला नानांनी घरी बोलावलं. त्याला विचारलं की, तू मटण वगैरे खातोस का? तो निर्माता नानांच्या घरी आला, त्यानं जेवण केलं. त्याला मटण खाऊ घातलं. त्यानंतर नाना त्याला म्हणाले की, आता खाल्लंस ना, मग आता भांडी स्वच्छ कर. नाना पाटेकर बाप आहे. वेगळ्या मातीचा बनलेला आहे.

पुढे परेश रावल म्हणाले, “जेव्हा नाना पाटेकर कॅरॅक्टर आर्टिस्ट म्हणून काम करीत होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या भूमिकेसाठी एक कोटी रुपये मानधनाची मागणी केली होती. त्यावेळी नायकदेखील तितके मानधन मागत नसत. नाना पाटेकरांनी तितके मानधन मागितले आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना तितके मानधन देण्यातही आले होते.” अभिनेते असेही म्हणाले की, नाना पाटेकर माझ्यापेक्षाही जास्त स्पष्टवक्ते आहेत. ते जे मनात आहे, तेच बोलतात.

परेश रावल व नाना पाटेकर यांनी पहिल्यांदा क्रांतिवीर या चित्रपटात एकत्र काम केले होते. १९९४ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. १९९७ ला प्रदर्शित झालेला ‘गुलाम-ए-मुस्तफा’, २००३ सालचा ‘आँच’ याबरोबरच ‘वेलकम’, ‘कमाल धमाल मालामाल’ व ‘वेलकम बॅक’ या चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केले आहे.

नाना पाटेकर हे अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्यामुळे त्यांची चर्चा होताना दिसते. कामाबरोबरच नाना पाटेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीदेखील ओळखले जातात.

दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. ‘क्रांतिवीर’ चित्रपटातील त्यांचा ‘आ गए मेरी मौत का तमाशा देखने’ असो वा ‘नटसम्राट’ चित्रपटातील ‘कोणी घर देता का घर’ हा डायलॉग असो; नाना पाटेकरांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.