Vidya Balan Talk’s About Late Director : विद्या बालन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिनं अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली. परंतु, सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या विद्यावर लोकप्रिय दिग्दर्शक नाराज होते. अभिनेत्रीनं याबद्दलची माहिती देताना खंत व्यक्त केली आहे.
विद्या बालनने ‘परिणीता’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यापूर्वी अभिनेत्रीकडून अनेक चित्रपटांत काम करण्याची संधी हुकली होती. ‘परिणीता’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी तिच्यावर विश्वास ठेवून, तिला तिच्या करिअरमधील महत्त्वाची संधी दिली. परंतु, नंतर हेच दिग्दर्शक व विद्या बालन यांच्यामध्ये अबोला होता. विद्या बालनने ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.
अभिनेत्री म्हणाली, “माझ्या करिअरची सुरुवात खूप कठीण होती. मला काम मिळत नव्हतं. तेव्हा एक दिवस एक पत्रकार आला आणि म्हणाला की, त्याला माझ्याबद्दल एक खोटी बातमी प्रसारित करण्याची इच्छा आहे, ज्यामुळे माझ्याबद्दल लोकांच्या मनात असणारे विचार बदलतील; पण मी त्याला नकार देत, मला अशी कोणतीही गोष्ट करण्यात रस नसल्याचं सांगितलं. अभिनेत्री म्हणून नावारूपाला येण्यापूर्वीच माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाले होते. जे चित्रपट प्रदर्शित होणार होते, त्यातला कुठलाच चित्रपट प्रदर्शित झाला नाही.”
विद्या पुढे म्हणाली, “असं असतानाही प्रदीपदादांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी प्रदीपदादांना एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान भेटले होते. आम्ही एक म्युझिक व्हिडीओ बनवला होता, ज्याबद्दल मला समजलं की, तो प्रदर्शित होणारच नाही. पण, सुदैवानं असं झालं नाही आणि तो म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला.”
दिग्दर्शकाबद्दल विद्या पुढे म्हणाली, “मी ‘परिणीता’च्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त गेले होते. तेव्हा माझं विधू विनोद चोप्रा व प्रदीप यांच्या पत्नींशी बोलणं झालं. माझा विश्वास बसत नाही की, आज ते हयात नाहीत. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. तेव्हा माझाही स्वत:वर विश्वास नव्हता. मला आठवतं की, विधू विनोद चोप्रा यांनी मला नाकाची शस्त्रक्रिया करायला सांगितली होती. तेव्हा मी घाबरले होते. मी घरी आले आणि प्रदीपदादांना मला यापासून वाचवा, असं सांगितलं. मला कोणताही बदल करायचा नव्हता. ते ‘परिणीता’च्या सेटवर लोकांना म्हणायचे. जर विद्यानं चित्रपटात काम केलं, तर हा चित्रपट चालेल.”
विद्या बालनने चित्रपटासाठी दिलेला नकार
विद्या पुढे याबाबत म्हणाली, “मी ‘लागे चुनरी में दाग’ या चित्रपटाला नकार दिल्यामुळे त्यांना माझा राग आला होता. दोन-तीन वर्षे त्यांनी माझ्याशी अबोला धरला होता. मला असं वाटतं की, त्यांचं मत असं असावं की, चित्रपट कसाही असू दे; पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. काही कारणांमुळे मला त्या चित्रपटाची कथा पटली नव्हती. दादांना यासाठी नाही म्हणनं माझ्यासाठी खूप कठीण होतं. ते कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी मी त्यांना दररोज फोन करायचे.”
विद्या बालनला वाटते खंत
“मला खूप वाईट वाटतं की, ज्यांच्याबद्दल मला इतकी कृतज्ञता आहे, त्यांच्याबरोबर मला संपर्क ठेवता आला नाही. त्यांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाला होता. त्यांच्या निधनामुळे मला धक्का बसला होता. मला त्यांना सांगायचं होतं की, आज मी जे काही आहे, ते त्यांच्यामुळेच आहे.”