बॉलीवूडमध्ये काम मिळवणं सोपं नाही. कलाकार वर्षानुवर्षे संघर्ष करतात, तेव्हा त्यांच्या वाट्याला चांगला चित्रपट येतो. बऱ्याच कलाकारांना अनेक वर्षे काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागते, तरीही चांगल्या भूमिका मिळत नाहीत. लहान-लहान भूमिका करून ते इंडस्ट्रीत टिकून राहतात. आज अशाच एका अभिनेत्रीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ही अभिनेत्री म्हणजे पारुल गुलाटी होय. अलीकडच्या काळात पारुल ही तिच्या अभिनयापेक्षा व्यवसायामुळे जास्त चर्चेत राहिली. पारुल लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तिने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. कॉमेडी किंग कपिल शर्माबरोबर पारुल गुलाटी ‘किस किस को प्यार करूं 2’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. इंडस्ट्रीत १५ वर्षांच्या करिअरनंतर पहिल्यांदाच पारुलचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

पारुलने या नवीन प्रवासाबद्दल तिच्या इन्स्टाग्रामवर माहिती दिले. पारुलने याबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “१५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, अखेर तो दिवस आला आहे, मी हिंदी चित्रपटसृष्टीच्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे, तेही कपिल शर्माबरोबर,” असं पारुलने लिहिलं. पारुल गुलाटीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

पाहा पोस्ट

पारुल गुलाटी बऱ्याच काळापासून मनोरंजन विश्वाचा भाग आहे. तिने अनेक भाषांमधील वेब सीरिज, ओटीटी शो आणि म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केलं आहे. पण बॉलीवूडमध्ये हा तिचा पहिला मोठा चित्रपट आहे. “कॉमेडी हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव आहे. मी नेहमीच नाट्यमय आणि भावनिक भूमिका साकारल्या आहेत, पण यावेळी कपिल शर्माबरोबर काम करताना मी स्वतःला एका वेगळ्या झोनमध्ये पाहिलं,” असं पारुल गुलाटी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाबद्दल म्हणाली.

‘किस किस को प्यार करूं 2’ या चित्रपटात कपिल शर्माने मुख्य भूमिका केली आहे. यामध्ये पारुल गुलाटी आणि बिग बॉस १७ फेम आयेशा खान यांचा समावेश आहे. तसेच अभिनेत्री वारिना हुसेन कपिल शर्माच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे.