अभिनेते कमल हासन त्यांच्या आगामी ‘ठग लाईफ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा एक अॅक्शन सिनेमा असून यामध्ये ते मुख्य भूमिकेत झळकणार आहेत; तर नुकतंच या चित्रपटाचा म्युझिक लाँचचा कार्यक्रम पार पडला. यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कलाकारांनी संवाद साधला. यावेळी कमल हासन यांनीदेखील कार्यक्रमात हजेरी लावत संवाद साधला. परंतु, त्यांनी यादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे ते आता चर्चेत आले आहेत.

चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या कार्यक्रमात कमल हासन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. कमल हासन यांनी या कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानानंतर कर्नाटकामधील लोकांनी यावर आक्षेप घेतला आहे. कमल हासन तामिळ भाषेचं कौतुक करताना म्हणाले होते, “तामिळ भाषा माझं आयुष्य आणि माझं कुटुंब आहे.” या कार्यक्रमाला अभिनेते शिवराजकुमार यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी कमल हसन त्यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, “ते माझे जवळचे आहेत, आमच्यामध्ये कौटुंबिक संबंध आहेत, म्हणून ते इथे आहेत; म्हणून सुरुवातीला मी तामिळ माझं कुटुंब आहे असं म्हटलं होतं. तुमची कानडी भाषा तामिळपासून जन्माला आली आहे.”

कमल हासन यांच्या या विधानामुळे कर्नाटकामधील अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. यानंतर कमल हासन यांचा निषेध करण्यात आला आणि त्यांचे फोटो, पोस्टर फाडण्यात आले. तर याकरिता तेथील स्थानिकांनी कमल हासन यांना माफी मागण्यास सांगितले आहे. कानडी भाषेचा अपमान केल्याने त्यांचा निषेध करण्यात आला, तर काहींनी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.२८ मे बुधवारी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “कमल हसन यांना कानडी भाषेचा इतिहास माहीत नाही. ती सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे. कानडी भाषेचा इतिहास खूप मोठा आहे. कमल हासन यांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कानडी भाषेबद्दल बोलल्याने झालेल्या वादावर कमल हासन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार कमल हासन म्हणाले, “मी जे खूप प्रेमाच्या भावनेतून बोललो होतो त्यासाठी माफी मागणार नाही. राजकारणी भाषेबद्दल बोलण्याकरिता तितके जाणकार नाहीत”; तर कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री त्रिशा कृष्णन, महेश मांजरेकर, एसटीआर यांसारखे कलाकार झळकणार आहेत.