Popular TV actor on compared to Amitabh Bachchan: अभिनेता रोनित रॉय हा सध्या विविध वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने ‘काबिल’, ‘एक खिलाडी एक हसीना’, ‘अपार्टमेंट’, ‘प्लॅन’ अशा चित्रपटांतील भूमिकांमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. याबरोबरच, ‘अदालत’ सारख्या लोकप्रिय टीव्ही शो मध्येदेखील तो दिसला होता.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने सुरुवातीच्या काळात त्याला संघर्षाचा सामना करावा लागला होता. पहिला चित्रपट केल्यानंतरही तो जपून पैसे खर्च करत असे, असे वक्तव्य त्याने केले. त्याबरोबरच त्याच्या खासगी आयुष्याबाबतही त्याने खुलासा केला. त्याच्या दारूच्या व्यसनाबाबत त्याने वक्तव्य केले आहे.
रोनित रॉय काय म्हणाला?
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “९० च्या दशकाच्या उत्तरार्धात मी टीव्हीमध्ये काम करत होतो. जेव्हा मी बालाजीसोबत माझा पहिला शो केला, तेव्हा लोकांमध्ये माझ्या दारूच्या व्यसनाची चर्चा होती. इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे ही गोष्ट पसरली होती. लोक माझ्याबाबत म्हणायचे की त्याचे करिअर आता संपले आहे.”
रोनित रॉयने पुढे ‘परदेस’ चित्रपटात शाहरुख खानबरोबर काम करण्याची संधी गमावल्याचेदेखील सांगतिले. रोनित ऐवजी अपूर्व अग्नीहोत्रीने परदेस चित्रपटात भूमिका साकारली. त्याच्या वाईट सवयींमुळे त्याला ती भूमिका मिळाली नसावी, असेही रोनित म्हणाला. अभिनेता म्हणाला, “मुक्ता आर्टस हे माझ्या घरासारखं होतं. असिस्टंट म्हणून माझ्या करिअरला मी तिथूनच सुरुवात केली होती. मी अनेकांकडून ऐकलं होतं की, ती भूमिका मला मिळणार आहे. मला अभिनेता व्हायचंय हे सगळ्यांना माहीत होतं. अशा परिस्थितीत जेव्हा अशा चर्चा ऐकायला येतात, त्यावेळी आपण त्यावर विश्वास ठेवतो. मात्र, सुभाषजींनी माझ्या कास्टिंगबाबत कधीच दुजोरा दिला नव्हता.”
“पण जेव्हा चित्रपटातील कलाकारांबाबत जेव्हा घोषणा झाली, त्यावेळी मी सुभाष घई सरांना माझ्या भूमिकेबद्दल विचारलं.तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांनी अपूर्वच्या वडिलांना आधीच वचन दिले आहे की ते त्याला लाँच करतील. ती भूमिका गमावण्याबद्दल माझ्या मनात कोणतीही खंत नाही. अपूर्वच्या नशिबाने त्याला ती भूमिका मिळाली होती.
त्यानंतर रोनितने टेलिव्हिजनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्याला टीव्ही मालिकांमधून लोकप्रियता मिळू लागली, लोक त्याला टेलिव्हिजनचे अमिताभ बच्चन म्हणू लागले. यामुळे दडपण आल्याचेदेखील रोनित रॉयने कबूल केले. पण, यामुळे त्याच्या वाईट सवयी दूर करण्यास त्याला मदत झाली. त्याला असे वाटत होते की अमिताभ बच्चन यांचे नाव माझ्यासारख्या व्यक्तीशी जोडले जाऊ नये, जो त्याच्या कामात १०० टक्के देत नाही. त्यामुळे थोडेसे दडपण आले. पण, त्यामुळेच मी माझ्यात बदल घडलू शकलो. जर आपण अमिताभ बच्चन यांना फॉलो करत असू, तर आपल्याकडून चुका होत नाही.
रोनित रॉय पुढे म्हणाला की, जरी मी ड्रग्ज वगळता सगळी व्यसने केली असली तरी अमिताभ बच्चन यांच्याशी झालेली तुलना माझ्या आयुष्यतील टर्निंग पॉइंट ठरली. त्यामुळे माझ्या व्यक्तीमत्वाची दुसरी बाजू पुढे आली. मी स्वत:ला चांगल्या सवयी लावल्या. वाईट सवयी दूर केल्या. त्यामुळे माझे चांगले व्यक्तीमत्व समोर आले.
दरम्यान, रोनित रॉय नुकताच काजोलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माँ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.