Prem Sagar passed away: चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र आणि निर्माते प्रेम सागर यांचे रविवारी निधन झाले. ३१ ऑगस्ट २०२५ ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. प्रेम सागर यांचे अंत्यसंस्कार आज मुंबईतील जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत केले जातील.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार, प्रेम सागर काही काळापासून आजारी होते. त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अरुण गोविल यांनी व्यक्त केल्या भावना

प्रेम सागर यांच्या निधनानंतर अरुण गोविल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अरुण गोविल यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, रामायण टीव्ही मालिकेच्या रूपात इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भगवान श्री रामांची प्रतिष्ठा, आदर्श आणि शिकवण जनतेपर्यंत पोहोचवणारे दिवंगत श्री रामानंद सागर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री प्रेम सागर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी मी भगवान श्री राम यांच्याकडे प्रार्थना करतो, ओम शांती.”

अरुण गोविल यांच्याबरोबरच ‘रामायण’मध्ये ‘लक्ष्मण’ची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी यांनीही त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट शेअर केली. त्यांनी दु:ख व्यक्त करत लिहिले, “ही खूप धक्कादायक बातमी आहे. आम्ही रामायणाचे रामानंद सागर जी यांचे पुत्र प्रेम सागरजी यांना गमावले आहे, ओम शांती.”

प्रेम सागर यांनी पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथून १९६८ साली शिक्षण पूर्ण केले. ते निर्माते असण्याबरोबरच सिनेमॅटोग्राफरदेखील होते. प्रेम सागर यांनी सागर आर्ट्स बॅनरखाली बराच काळ काम केले. हे प्रोडक्शन हाऊस त्यांचे वडील रामानंद सागर यांनी सुरू केले होते. रामानंद सागर यांना रामायण या मालिकेमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘रामायण’ हा चित्रपट पहिल्यांदा १९८७ मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित झाला होता.

प्रेम सागर यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ‘अलिफ लैला’ या टीव्ही मालिकेचे ते दिग्दर्शक होते. याशिवाय त्यांनी ‘काकभूशुंडी रामायण’ आणि ‘कामधेनु गौमाता’ या धार्मिक प्रकल्पांची निर्मिती केली. निर्माता म्हणून त्याने ‘हम तेरे आशिक हैं’, ‘बसेरा’ आणि ‘जय जय शिव शंकर’सारखे प्रोजेक्ट्सही केले.

प्रेम सागर यांनी १९६८ च्या ‘आँखें’ आणि १९७२ च्या ‘ललकर’ चित्रपटात कॅमेरा आणि इलेक्ट्रिकल विभागात काम केले, तर १९७६ च्या ‘चरस’ चित्रपटात ते सिनेमॅटोग्राफर होते.