अभिनेता आर. माधवन त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. तो भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. तो अभिनयासह लेखन, दिग्दर्शनदेखील करतो. आजवर त्यानं अनेक भूमिका साकारल्या आहेत. दक्षिण इंडस्ट्रीसह त्यानं बॉलीवूडमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलीवूडमध्ये त्यानं ‘रहना है तेरे दिल में’, ‘गुरू’, ‘झिरो’, ‘३ इडियट्स’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. परंतु, त्यानं ‘३ इडियट्स’मध्ये साकारलेल्या भूमिकेनं साऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित त्या चित्रपटात आर. माधवननं महाविद्यालयीन मुलाची भूमिका साकारली होती. त्यामध्ये आमिर खान, शर्मन जोशी व आर. माधवन असं त्रिकूट पाहायला मिळालं होतं. या चित्रपटाची आजही तितकीच क्रेझ असून, त्यातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. परंतु, तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटात आमिर खान, शर्मन जोशी, आर. माधवन यांनी महाविद्यालयीन मुलांची भूमिका साकारली असली तरी तेव्हा ते त्यांच्या वयाच्या ३०-४० शीत होते. आर. माधवन यानं हा चित्रपट केला तेव्हा तो ४० वर्षांचा होता.
त्याने ‘न्युज १८’ला दिलेल्या मुलाखतीत नुकतंच याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला, “मी वयाच्या ४० व्या वर्षी ‘३ इडियट्स’ या चित्रपटात १८ वर्षीय मुलाची भूमिका साकारली. या चित्रपटासाठी आम्ही एका महाविद्यालयामध्ये शूटिंग करीत असताना तेथील मुलांना बघायचो तेव्हा त्यातील बरीच मुलं आमच्याहूनही अधिक वयाची वाटायची. त्यामुळे आम्हाला त्यांना विचारावं लागायचं की, तुम्ही विद्यार्थी आहात की शिक्षक आणि जेव्हा ते आम्ही विद्यार्थी आहोत, असं म्हणायचे. तेव्हा आम्हाला आम्ही तिशी-चाळिशीतही वयस्कर वाटत नसल्याचा आनंद व्हायचा.”
पुढे तो म्हणाला, “विद्यालयातील काही मुलांचे केस पिकलेले असायचे; तर काहींना टक्कल पडलेलं होतं. त्यामुळे मी चाळिशीतही १८ वर्षांच्या महाविद्यालयीन मुलाची भूमिका साकारतोय या गोष्टीनं मलाच जरा बरं वाटायचं.” ‘३ इडियट्स’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात आर. माधवन यांनी महाविद्यालयीन मुलाची भूमिका साकारली आहे; तर दुसऱ्या भागात ३० वर्षीय पुरुषाची भूमिका साकारली आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘३ इडियट्स’ हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटात आमिर खानसह अभिनेत्री करिना कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. त्यातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही प्रचंड आवडली होती. त्याशिवाय चित्रपटातील बोमन इराणी यांच्या भूमिकेनंही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.