Radhika Apte Net Worth : राधिका आपटेनं नेहमी वेगवेगळ्या कलाकृतींतील तिच्या भूमिकांमधून अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिनं कायम हटके व वैविध्यपूर्ण कथानकाला प्राधान्य दिल्याचं तिच्या कामामधून दिसून आलं. त्यामुळे आज ती मराठीसह हिंदीमध्येही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. परंतु, हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता.
राधिका आपटेचा आज ७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. अभिनेत्री यंदा तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिचा जन्म तमिळनाडू येथील एका मराठमोळ्या कुटुंबात झाला. तिचे वडील चारुदत्त आपटे डॉक्टर आहेत. राधिकानंही पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. राधिकानं ब्रिटिश संगीतकार बेनडिक्ट टेलरशी लग्न केलं आणि तिनं २०२४ मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला.
थिएटरपासून केलेली सुरुवात
माध्यमांच्या माहितीनुसार, राधिका आपटेला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि तिला कायम अभिनेत्री व्हायचं होतं. असं असताना तिनं चित्रपटांमध्ये झळकण्यापूर्वी रंगभूमीवर काम केलं आणि त्यातूनच ती स्वत:चा खर्च भागवायची. तिनं कधीही तिच्या वडिलांकडून पैसे घेतले नाहीत. रंगभूमीवर काम करीत असताना ती पैसे वाचवण्यासाठी बसनं प्रवास करायची.
२००५ मध्ये केलं बॉलीवूडमध्ये पदार्पण
राधिका आपटेनं रंगभूमीवर काम केल्यानंतर २००५ साली शाहिद कपूरच्या ‘लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘अंतहीन’ या चित्रपटात झळकली. राधिकानं ‘पुणे ५२’, ‘पोस्टकार्ड’, ‘मीडियम स्पायसी’, ‘समानंतर’ या मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. परंतु, ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते, ‘बदलापूर’ व ‘हंटर’ या चित्रपटांमुळे. त्यातील तिच्या कामाचं अनेकांकडून कौतुक झालं.
राधिकानं फक्त मराठी व हिंदी चित्रपटांतच नाही, तर तिनं दाक्षिणात्य व बंगाली चित्रपटांतही काम केलं आहे. राधिकानं ओटीटी विश्वसुद्धा गाजवलं आहे. तिने ‘लस्ट स्टोरीज’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘घोल’ यांसारख्या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
राधिका आपटे आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीन
‘सीएनबीसी’च्या अहवालानुसार राधिका आपटे ६०-६६ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिने चित्रपटांतून सर्वाधिक कमाई केली आहे. त्यासह ती बऱ्याच जाहिरातींमध्येही झळकली आहे.