Raid 2 Box Office Collection Day 2 : रितेश देशमुख व अजय देवगन यांचा ‘रेड 2’ चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहे. जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंगनंतर गुरुवारी १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संजय दत्त यांचा ‘भूतनी’ आणि ‘हिट 3’ व ‘रेट्रो’ तसेच हॉलीवूड चित्रपट ‘थंडरबोल्ट्स’शी टक्कर झाली. पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग करणाऱ्या ‘रेड 2’ ने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगणने पुन्हा एकदा आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत परतला आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय. रिलीजच्या पहिल्या दिवशीच हा चित्रपट २०२५ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
‘रेड २’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी १९.२५ कोटी रुपयांची कमाई केली. आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘रेड २’ ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ११.७५ कोटी रुपये कमावले आहेत. ‘रेड २’ ची दोन दिवसांची एकूण कमाई ३१ कोटी रुपये झाली आहे. ‘रेड २’ ने दुसऱ्या दिवशी २०२५ च्या अनेक चित्रपटांच्या एकूण कलेक्शनला मागे टाकलंय.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाली असली तरी ‘रेड २’ ने दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. बॉलीवूड हंगामाच्या आकडेवारीनुसार, ‘रेड २’ ने खालील चित्रपटांना मागे टाकले आहे.
ग्राउंड झिरो – ५ कोटी
सुपरबॉईज ऑफ मालेगाव – ३.५४ कोटी रुपये
क्रेझी – ११.०९ कोटी
मेरे हसबंड की बीवी – ९.३८ कोटी
लव्हयापा – ७.०४ कोटी रुपये
Badass Ravikumar – ९.६६ कोटी
इमर्जेन्सी- १६.५२ कोटी रुपये
आझाद – ६.३२ कोटी रुपये
फतेह – १२.८५ कोटी
गेम चेंजर – २६.६० कोटी रुपये
‘रेड २’ लवकरच वसूल करेल बजेट
‘रेड २’ च्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी ४८ कोटी रुपये खर्च केले आहेत. दोन दिवसांत या चित्रपटाने ३१ कोटी रुपये कमावून ८० टक्क्यांहून जास्त बजेट वसूल केले आहे. शनिवार व रविवारी वीकेंडला हा चित्रपट दमदार कमाई करेल, असा अंदाज आहे.
‘रेड २’ मधील कलाकार
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड 2’ मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक हे कलाकार आहेत.