Rajesh Khanna And Amitabh Bachchan: किशोर कुमार दिग्गज गायकांपैकी एक होते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासाठी बहुतेकदा किशोर कुमारच गाणी गात असत. त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांसाठी गाणी गायली. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील गाणी गाताना ते अमिताभ बच्चन यांच्यासाऱख्याच आवाजात गाणी गात, त्यामुळे चित्रपटातील गाणी अमिताभ बच्चन यांनी गायल्याचे प्रेक्षकांना वाटत असे.

असे असताना या दोन दिग्गजांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी नुकतीच रेडिओ नशाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन व त्यांचे वडील किशोर कुमार यांच्यात का मतभेद झाले, त्यांच्यात दुरावा का आला होता, यावर वक्तव्य केले.

किशोर कुमार व अमिताभ बच्चन यांच्यात का गैरसमज निर्माण झाले होते?

अमित कुमार म्हणाले, “दोन माणसांमध्ये गैरसमज होणे हा जीवनाचा भाग आहे. अमिताभ बच्चन एक उत्तम अभिनेते आहेत. आमचे त्यांच्याशी नेहमीच चांगले संबंध आहेत, पण हे खरे आहे की त्यावेळी थोडा गैरसमज निर्माण झाला होता.”

तो पुढे म्हणाला, “माझे वडील ‘ममता की छाओं में’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा शेवटचा चित्रपट होता. त्यांनी अमिताभ बच्चन यांचे नाव सुचवले. मात्र, त्यावेळी अमिताभ बच्चन इतर प्रोजेक्टमध्ये व्यग्र होते. या सर्व घडामोडींदरम्यान कुठेतरी एक गैरसमज निर्माण झाला. माध्यमांनी अतिशोयक्ती केली. मात्र, काही काळानंतर सर्व गोष्टी ठीक झाले. अमिताभ बच्चन घरी आले, त्यांनी माझ्या वडिलांना मिठी मारली आणि सर्व गैरसमज दूर झाले.”

अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर राजेश खन्ना यांनी या चित्रपटात काम केले. अमित कुमार यांनी राजेश खन्ना यांना या चित्रपटात काम करणार का? असे विचारले होते, त्यावर राजेश खन्ना म्हणालेले, काम करणार का असे विचारण्याचे तुम्ही धाडस कसे करू शकता. मी किशोर कुमार यांना विचारणार आहे की त्यांनी मला याआधी या भूमिकेसाठी फोन का केला नाही.

अमित कुमार यांनी असेही सांगितले की, राजेश खन्ना यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी एक रुपयाही घेतला नाही. जेव्हा माझे वडील त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.

अमिताभ बच्चन यांच्या बॉलीवूडमधील वाढत्या महत्वामुळे राजेश खन्ना यांचे करिअर हळूहळू संपुष्टात आल्याचे म्हटले जाते. या दोन दिग्गज अभिनेत्यांमध्ये मोठी स्पर्धा होती. ‘राजेश खन्ना: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट सुपरस्टार’ या पुस्तकात, खन्नाचे सचिव आणि २० वर्षांचे सहकारी प्रशांत रॉय यांनी लिहिले, “त्या दिवसांत, काकाजी अमिताभ बच्चनवर खूप रागवायचे. ते त्यांच्या जवळच्या मित्रांना सांगायचे की हृषिकेश मुखर्जी हे त्यांचे आवडते दिग्दर्शक होते, पण अमिताभ यांनी त्यांना माझ्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत.”

दरम्यान, राजेश खन्ना यांचे २०१२ साली निधन झाले. तर, अमिताभ बच्चन हे आजही विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.