Anita Advani on Rajesh Khanna: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते राजेश खन्ना हे आजही विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत, तसेच त्यांच्या खासगी आयुष्यातील किस्से अनेक कलाकार, त्यांच्या जवळच्या व्यक्ती मुलाखतींमध्ये सांगत असतात.
राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यांना ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली झाल्या. मात्र, राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर डिंपल कपाडिया त्यांच्या दोन्ही मुलींसह राजेश खन्ना यांच्या आयुष्यातून निघून गेल्या.
अनिता अडवाणी काय म्हणाल्या?
डिंपल कपाडिया यांच्याबरोबरचे नाते तुटल्यानंतर अनिता अडवाणी यांच्याबरोबर राजेश खन्ना हे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच २०१२ पर्यंत ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. आता अनिता अडवाणी यांनी नुकतीच ‘मेरी सहेली’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या व राजेश खन्ना यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले.
अनिता अडवाणी म्हणाल्या, “आम्ही रिलेशनशिपमध्ये असताना राजेश खन्ना व माझ्यात खूप भांडणे होत असत. मला त्यांच्या बोलण्यामुळे कधी वाईट वाटले आणि राग आला, तर मी घर सोडून जात असे. एकदा ते माझ्यासमोर एका मुलीचे कौतुक करीत होते. ते ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटले. मला राग आला होता. मी त्यांना म्हणाले की, तुम्ही तिच्याबरोबर राहा. त्यावर ते मला म्हणाले की, मी फक्त तिचे कौतुक करीत होतो. लोक चार वेळा लग्न करतात, त्यांना खूप गर्लफ्रेंड असतात. त्यानंतर आमचे खूप भांडण झाले आणि मी घरातून निघून गेले.”
“आमचे भांडण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी राजेश खन्ना मला सतत फोन करत होते. ते म्हणाले की, अयोध्येत काही कायदेशीर गोष्टी घडल्या आहेत. तिथे आंदोलने होऊ शकतात. गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. तू शक्य तितक्या लवकर घरी ये. त्यावर मी त्यांना म्हणाले की, तुम्ही काळजी करावी, असे अनेक लोक तुमच्या आयुष्यात आहेत. तुम्ही माझी काळजी कशाला करत आहात? त्यावर ते म्हणाले की, तू काहीही बोलू नकोस. जर तुला काही झालं, तर मी जग जाळून टाकेन.”
याच मुलाखतीत अनिता अडवाणी असेही म्हणाल्या की, जेव्हा मी पहिल्यांदा राजेश खन्नांना भेटले होते, त्यावेळी त्यांचे लग्न झाले नव्हते. त्यावेळी ती सुपरस्टार होती. माझे वय तेव्हा फारच कमी होते. ते डिंपल कपाडियापासून ते वेगळे झाले; पण त्यांचा कधीच घटस्फोट झाला नाही. आम्ही खासगीत लग्न केले होते. पण, चित्रपटसृष्टीत या गोष्टी कोणीही मोकळेपणाने बोलत नाही. सगळ्यांना असेच वाटत होते की, आम्ही मित्र आहोत किंवा आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. आम्ही एकत्र आहोत, असे वृत्त आधीच मीडियामध्ये आले होते. त्यामुळे आमच्या नात्याबद्दल घोषणा करण्याची आम्हाला गरज वाटली नाही.