‘खून भरी माँग, ‘किशन कन्हैया’, ‘खेल’, ‘करण-अर्जुन’, ‘कोयला’, ‘कहो ना प्यार है’, ‘कोई मिल गया’ अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी राकेश रोशन(Rakesh Roshan) यांना ओळखले जाते. राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणूनदेखील काम केले आहे. मात्र, त्यांना अशा लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख मिळाली. राकेश रोशन हे अनेकदा त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे किस्से सांगतात. त्यांनी त्यांच्यावर जो गोळीबार झाला होता, यावरही खुलासा केला आहे. करण-अर्जुन चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सलमान खान व शाहरूख खान त्यांना कसा त्रास देत असत, याबाबत त्यांनी आता वक्तव्य केले आहे.

सलमान-शाहरूख खानविषयी काय म्हणाले राकेश रोशन?

राकेश रोशन यांनी नुकतीच रेडिओ नशाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सलमान खान व शाहरुख खानविषयी बोलताना म्हटले की, करण-अर्जुन चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघेही खूप तरुण होते. ते सेटवर खूप प्रँक करायचे. कधी कधी मी त्यांच्यावर रागवायचो. कधी कधी ते मजा करताना त्यांची सीमारेषा ओलांडत असत. मी विचार करायचो की, मी त्यांच्यासारखे वागता नये. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर वडिलांप्रमाणे वागत असे. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे.

सलमान-शाहरूख कोणत्या प्रकारचे प्रँक करीत असत? यावर राकेश रोशन यांनी म्हटले की, ते माझ्या खोलीबाहेर गोळीबार करीत असत. मी रात्री गाढ झोपेत असताना मला गोळीबार केल्याचे आवाज जेव्हा येत असत. अशावेळी मी त्यांना तुम्ही काय करत आहात, असे विचारल्यावर ते म्हणत की, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करीत आहोत, अशी आठवण राकेश रोशन यांनी सांगितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतीच द रोशन्स ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली. त्यामध्ये शाहरूख खानने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या त्याच्या वागण्याबद्दल राकेश रोशन यांची माफी मागितली. शाहरुख खानने आठवण सांगत म्हटले, “पिंकीजी मला याबद्दल ओरडत असत. तू गुड्डूला (राकेश) त्रास देत आहेस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही, असे त्या म्हणत. कारण- सलमान व माझ्यामध्ये मी जरा चांगला वागत असे. कमीत कमी तोंडावर मी चांगला वागत असे. कोणत्याही प्रँकनंतर मी असे दाखवत असे की, मी काहीच केले नाही आणि हे सगळं सलमान खान करत आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आम्ही खूप तरुण होतो. राकेश रोशन हे आम्हाला वडिलांसारखे होते आणि आम्ही त्यांना खूप त्रास देत असू.